नवी दिल्ली – भाजपाला आपले ट्विटर हँडल वापरायला दिल्याच्या मोबदल्यात न्यू इंडिया बँकेतील १८ कोटींचे कर्ज माफ केल्याच्या केरळ काँग्रेसच्या पोस्टमुळे अभिनेत्री प्रिती झिंटा संतप्त झाली आहे. ही एक अफवा असून या कर्जाची दहा वर्षांपूर्वीच परत फेड केली आहे.
केरळ काँग्रेसच्या एका एक्स अकाऊंटवर माहिती देण्यात आली होती की, न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेचे गुंतवणूकदार रस्त्यावर न्याय मागत आहेत. तर दुसरी कडे प्रिती झिंटाचे समाज माध्यम भाजपाकडून वापरण्यात आल्याच्या मोबदल्यात तिचे १८ कोटीचे कर्ज माफ करण्यात आले. यावर प्रिती झिंटाने संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. आपल्या एक्स पोस्टवर तिने म्हटले आहे की, ही चुकीची माहिती आहे. दहा वर्षांपूर्वीच माझ्या कर्जाची पूर्ण परतफेड करण्यात आली होती. त्याची सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत. माझी भाजपाबरोबर जवळीक असल्याचेही चुकीचे असून राजकारणासाठी अशा प्रकारच्या खोट्या बातम्या पसरवणे चुकीचे आहे. मी माझे एक्स अकाऊंट स्वतः वापरत असून माझ्या या उत्तराने सर्वांचे समाधान होईल अशी अपेक्षा आहे.