नवी दिल्ली – बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विरोधकांनी आज संसदेत आक्रमक भूमिका घेतली. बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेच्या मकरद्वार येथे आंदोलन केले.संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एसआयटी स्थापन करावी ,अशी मविआच्या खासदारांनी मागणी केली.
बजरंग सोनावणे म्हणाले की, संतोष देशमुख हत्येमागचा मास्टरमाईंड शोधून त्याला शिक्षा व्हावी. या खुनाचा कट कोणी रचला याची माहिती पोलिसांनी दिली पाहिजे. पीएसआयला निलंबित केले. त्याला सहआरोपी केले पाहिजे, अशी माझी मागणी आहे. कारण तो पीएसआय आरोपीसोबत चहापान करत होता. या आरोपींचे सीडीआर तपासावे. ते तपासल्यास लक्षात येईल की, त्याला कोणाचे फोन आले होते.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मला चौकशीचे आश्वासन दिले आहे. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रकरणी एसआयटी स्थापन करू. पंकज देशमुख, हर्षद पोतदार अशा चांगल्या अधिकाऱ्यांमार्फत एसआयटी स्थापन करा, अशी आमची मागणी आहे.