व्हिएन्ना
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यानंतर काल रात्री उशिरा ऑस्ट्रिया येथे पोहोचले. त्यांचे व्हिएन्ना येथे रेड कार्पेटवर भव्य स्वागत करण्यात आले. पंतप्रधान मोदी विमानतळावर पोहोचताच ऑस्ट्रियाचे परराष्ट्र मंत्री अलेक्झांडर शॅलेनबर्ग त्यांच्या स्वागताला आले होते. ४१ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारतीय पंतप्रधानांनी ऑस्ट्रियाला भेट दिली. “भारत आणि ऑस्ट्रिया यांच्यातील मैत्रीचे संबंध आगामी काळात आणखी मजबूत होतील,”असे मोदींनी म्हटले.
पंतप्रधान मोदींनी अधिकृत चर्चेपूर्वी ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर कार्ल नेहमर यांची रात्रीच्या जेवणाच्या निमित्ताने खासगी भेट घेतली. यावेळी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दोन्ही पंतप्रधानांनी एकमेकांची गळाभेट घेतली आणि नेहमर यांनी मोदींसोबत सेल्फी काढला. हा फोटो नेहमर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर पोस्ट केला. “व्हिएन्नामध्ये पंतप्रधान मोदींचे स्वागत आहे. ऑस्ट्रियामध्ये तुमचे स्वागत करणे ही आमच्यासाठी आनंदाची आणि सन्मानाची गोष्ट आहे. ऑस्ट्रिया आणि भारत हे मित्र आणि भागीदार आहेत. मी आपल्या भेटीतील राजकीय आणि आर्थिक चर्चेसाठी उत्सुक आहे,” असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले.
दरम्यान, मोदींनी आपल्या एक्सवर पोस्ट करत ऑस्ट्रियातील भव्य स्वागताबद्दल नेहमर यांचे आभार मानले आहेत. ‘मला उद्याच्या चर्चेची प्रतीक्षा आहे. जागतिक हितासाठी आम्ही एकत्र काम करत राहू.’ असे मोदींनी म्हटले आहे.