धाराशिव- तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात मादक पदार्थ तस्करी आणि सेवनाचे मोठे रॅकेट सुरू आहे आणि तब्बल दीड हजार तरुण ड्रग्जच्या विळख्यात सापडले आहेत. या संकटाच्या विरोधात तुळजापूरमधील पुजारी, व्यापारी, आणि ग्रामस्थ एकवटले आहेत. त्यांनी या विरोधात ठोस कारवाईची मागणी करीत इशारा दिला की, कारवाई झाली नाही तर रास्ता रोको करून तुळजापूर शहर बंद आंदोलन केले जाईल.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना चार महिन्यांपूर्वीच ड्रग्जच्या संकटाची माहिती देण्यात आली. मात्र त्यांनी त्यावर पांघरूण घातल्याचा आरोप पुजारी आणि व्यापाऱ्यांनी केला.
राज्यात गांजा, चरस यासह इतर अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेष म्हणजे या व्यसनाला तरुण अधिक संख्येने बळी पडत आहेत. बदलती जीवनशैली, सोशल मीडियाचा प्रभाव आणि फॅशन म्हणून या पदार्थांचे सेवन करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक तुळजापूरमध्ये येत असतात आणि या तुळजापूर नगरीला आता मादक पदार्थाच्या विळख्याने घेरल्याची परिस्थिती आहे.
शुक्रवारी 14 फेब्रुवारीला रात्री सोलापूर-तुळजापूर महामार्गावर तामलवाडी टोल नाक्याजवळ स्थानिक गुन्हे शाखा आणि तामलवाडी पोलिसांनी एका गाडीतून अडीच लाख रुपये किमतीचे मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाच्या गोळ्या आणि दहा लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर या प्रकरणाच्या तपासात उघड झाले की, मुंबईत एका महिलेकडून हे ड्रग्ज खरेदी करून विक्रीसाठी तुळजापूरमध्ये आणले होते. या घटनेनंतर पुजारी, व्यापारी व स्थानिकांनी आक्रमक होऊन बैठक घेतली. या बैठकीत तुळजापुरात अडीच वर्षांपासून ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आणि दीड हजारांपेक्षा जास्त तरुण ड्रग्जच्या विळख्यात अडकल्याचा दावा करण्यात आला. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना याची माहिती देऊनही यावर तोडगा निघाला नाही. किंबहुना या प्रकरणावर पोलिसांकडून पांघरूण घातले जात असल्याचा खळबळजनक आरोप पुजारी व नागरिकांनी केला. 20 फेब्रुवारीला पालकमंत्री शिंदे गटाचे ठाण्याचे प्रताप सरनाईक तुळजापूरमध्ये येणार आहेत. त्यांना ड्रग्ज तस्करी आणि रॅकेट चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्याबाबत निवेदन दिले जाणार आहे. निवेदन दिल्यानंतरही कारवाई न केल्यास ग्रामस्थ, पुजारी आणि व्यापाऱ्यांनी रस्ता रोको आणि तुळजापूर बंदचा इशारा दिला आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी देखील आता याबाबत आवाज उठवलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबत त्यांनी पत्र देखील दिलेले आहे. या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करावा आणि आरोपींना जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे.
याबाबत पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे म्हणाले की, तुळजापूरचे नाव ड्रग्जमुळे बदनाम होत आहे. पोलीस प्रशासनाला याबाबत माहिती असून, देखील ते कारवाई करत नाहीत. या प्रकरणामागे येथील पीआय आणि डीएसपींचा हात आहे. त्यामुळे त्यांची तत्काळ बदली करावी. यासाठी आम्ही लवकरच लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत.
तुळजापुरात ड्रग्जचे रॅकेट! पुजाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
