मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आपले नवी पुस्तक ‘डायरी ऑफ ए होम मिनिस्टर’ लवकरच प्रकाशित करणार आहेत. या पुस्तकाचे हिंदी, मराठी आणि इंग्रजी आवृत्तीचे कव्हर पेज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्वीट केले आहे. ट्वीट करत अनिल देशमुख म्हणाले की, प्रत्येक हेडलाईनच्या मागे एक कथा दडलेली असते – माझ्या राजकीय आत्मकथेत लपलेले धक्कादायक सत्य आणि खुलासे नक्की जाणून घ्या. देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देईल अशा माझ्या पुस्तकाचे कव्हर पेज शेअर करत आहे!
या पुस्तकाच्या पृष्ठावर लिहिले आहे की, समाजकारणाची आस धरून राजकारणात उतरलेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व. छोट्या-छोट्या पदांपासून सुरू असलेला प्रवास, थेट गृहमंत्री पदापर्यंत पोहोचला. या प्रवासात सुखाच्या लहरींइतकीच काटेरी वाटही होती. ही वाट पावलांना रक्तबंबाळ करणारी होती. गृहमंत्री म्हणून ज्या यंत्रणेवर नियंत्रण मिळवले, त्याच यंत्रणेतल्या एका सडलेल्या मनोवृत्तीने काही राजकीय विरोधकांशी हातमिळवणी करून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुढे संकटांची रास उभी केली आणि एका गृहमंत्र्यांनाच खोट्या आरोपांखाली तुरुंगवास अनुभवावा लागला. … पण अनिल देशमुख हे डगमगणारे नावच नव्हे. तुरुंगातल्या दिवसांनाही त्यांनी सकारात्मकतेत परिवर्तित केले. आणि सुदृढ आचारविचारांचा नवा वस्तुपाठ रचला. त्यांचा हा विलक्षण, अंतर्मुख करणारा प्रवास या पुस्तकात अनुभवास येतो. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणातील संस्कृतीचा आदर्श देशभरात दिला जायचा. आता हा प्रवास केंद्रीय यंत्रणेचा वापर करीत विरोधकांना नेस्तनाबूद करण्याची नवी संस्कृती महाराष्ट्रात जन्माला आली आहे. याचा डोळ्यांत अंजन घालणारा साक्षात्कारही हे पुस्तक घडवते.
स्फोटक, परखड, तरीही तितकेच काळजाला हात घालणारे, विलक्षण आत्मकथन..