जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला बोलावले नाही! शिंदेंचे आमदार संतप्त

मुंबई – रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक आज ऑनलाईन पद्धतीने मंत्रालयातून पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या या बैठकीला आपल्याला निमंत्रणच नव्हते, असा दावा करत रायगडमधील शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांनी नाराजी व्यक्त केली. या बैठकीला अजित पवार गटाच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे मात्र उपस्थित होत्या. रायगडच्या पालकमंत्रिपदावरून आधीच वाद असताना शिंदे गटातील आमदारांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला न बोलावल्यामुळे शिंदे आणि अजित पवार गटातील तणाव आणखी वाढणार आहे.
कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले की, आम्हाला रायगड जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीची माहिती देण्यातच आली नाही. याचा अर्थ काहीतरी गौडबंगाल आहे. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. आमच्या मतदारसंघातील महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित आहेत. आजच्या बैठकीला जिल्हाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आम्हाला बैठकीबाबत सांगितले पाहिजे होते. या बैठकीला अदिती तटकरे उपस्थित राहू शकतात. तसे आम्हीदेखील उपस्थित राहिलो असतो.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हेदेखील याबद्दल नाराजी व्यक्त करत म्हणाले की, या बैठकीला अजित पवार, अदिती तटकरे आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. आम्ही सर्व आमदार रायगडमध्ये होतो. तरीही आम्हाला बैठकीचे निमंत्रण नव्हते. आजची बैठक अधिकृत होती, तर आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले पाहिजे होते. आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत याबाबत चर्चा करणार आहोत. आमच्यावर वारंवार अन्याय होत असून, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे.
या बैठकीला महाडचे शिंदे गटाचे आमदार आणि रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांना निमंत्रण होते. परंतु ते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. ते म्हणाले की, आज रायगडावर भिडे गुरुजींचे धारकरी आले होते. त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहणे आवश्‍यक होते. त्यामुळे बैठकीला येणार नाही, हे मी आधीच सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनाही याबाबतची माहिती दिली होती.
या बैठकीबाबत शिंदे गटाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून असे स्पष्टीकरण देण्यात आले की, सध्या नाशिक आणि रायगड या दोन्ही जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. त्यामुळे सदर जिल्ह्यांतील केवळ मंत्र्यांना जिल्हा बैठकीसाठी बोलावण्यात आले. रायगडमधून मंत्री अदिती तटकरे आणि मंत्री भरत गोगावले यांना निमंत्रण दिले होते. परंतु बैठकीसाठी ते हजर राहिले नाहीत.
तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आज पालकमंत्र्यांची बैठक नव्हती. तर रायगडच्या जिल्हा नियोजनासंदर्भात बैठक झाली. त्यात अनेक विषयांवर चर्चा झाली. पालकमंत्रिपदाचा वाद लवकरच सुटेल. आमदारांनी त्यांच्या भागातील ज्या काही सूचना असतील, त्या द्याव्यात. त्यांचा मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अर्थसंकल्पात विचार करू. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती केली होती. त्याला शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी कडाडून विरोध केला.
रायगडचे पालकमंत्रिपद आपल्यालाच मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या समर्थकांनी या मागणीसाठी आंदोलन करत मुंबई-पुणे महामार्गही बंद पाडला होता. रायगडच्या शिंदे गटातील महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी या आमदारांनी गोगावलेंच्या मागणीचे समर्थन केले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट दाव्होसमधून अदिती तटकरे यांची रायगडच्या पालकमंत्रिपद केलेली निवड रद्द केली. तेव्हापासून अजित पवार गट आणि शिंदे गट यांच्यात वादाची ठिणगी पडली असून, त्यामुळे रायगडच्या पालकमंत्रिबाबत अजूनही निर्णय प्रलंबित आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top