विधानसभेचे निकाल पटणारे नाहीत! राज ठाकरे भाजपावर जोरदार बरसले

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विधानसभा निकालांवर संशय व्यक्त केला. हे निकाल महाराष्ट्रात कुणालाच पटलेले नाहीत असे म्हणत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. त्यांच्या या वक्तव्याने ईव्हीएम विरोधात सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनाला बळ मिळाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळीच्या एनएससीआय डोममध्ये आज दुपारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी विधानसभा निकालावर आक्षेप घेत ते म्हणाले की, आमचे राजू पाटील यांच्या गावात 1400 मते आहेत. प्रत्येक निवडणुकीत गाव त्यांनाच मत देते. विधानसभेत मात्र त्यांच्या गावातून त्यांना एकही मत मिळाले नाही. लोकसभेत एक खासदार निवडून आलेल्या अजित पवार गटाचे विधानसभेत 42 आमदार निवडून आले. 4 महिन्यांत लोकांच्या मनात असा काय फरक पडला? हा संशोधनाचा विषय आहे. एक लक्षात घ्या, लोकांनी आपल्याला मतदान केले आहे. फक्त ते आपल्यापर्यंत पोहोचलेच नाही. ते मध्येच गायब झाले. विधानसभा निवडणुकीचे निकाल माझ्यासह लोकांनाही पटणारे नाहीत.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, ज्या दिवशी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी राज्यात सन्नाटा पसरला होता, हे मी पहिल्यांदा पाहिले. विजयी मिरवणूक आणि जल्लोष व्हायला पाहिजे होता. तो राज्यात झालाच नाही. लोकांमध्ये संभ्रम होता.असा निर्णय कसा आला? हा निकाल पटलेला नाही, असे संघाशी संबंधित एका व्यक्तीने मला सांगितले. ते मला म्हणाले की, इतना सन्नाटा क्यू हैं भाई, कोई तो जीता होगा, मराठवाड्यात एक पदाधिकारी नगरसेवक होता. नगरसेवक झाला, त्यावेळी त्या वार्डातून साडेपाच हजार मते मिळाली होती. आता तो विधानसभा निवडणुकीत उभा होता. त्याला त्या वॉर्डात विधानसभेला अडीच हजार मते मिळाली. अनेक असे निर्णय आहेत, ज्यावर निवडून आलेल्यांचा विश्वास बसत नाही. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले.ही त्यांची आठवी टर्म होती. सातवेळा जे 70 ते 80 हजार मताधिक्क्याने निवडून यायचे. या निवडणुकीला त्यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला. उद्या लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला म्हणून बोलत आहेत. मी काय बोलत आहे? अख्खा महाराष्ट्र बोलत आहे. जे निवडून आले आहेत, त्यांचे अनेकांचे फोन आले. त्यांनाही धक्का बसला आहे. भाजपाला मागच्या विधानसभेत 105, त्याच्याआधी 2014 साली 122 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे यावेळी भाजपाला 132 जागा मिळतील हे समजू शकतो. पण अजित पवार गटाच्या 42 जागा निवडून येतात कशा, ज्यांच्या चार-पाच जागा येतील असे सर्वांना वाटत असताना अजित पवार गटाचा 42 जागांवर विजय होईल अशा कोणाचा विश्वास बसेल का? अजित पवार आणि छगन भुजबळ ज्यांच्या जीवावर हे राजकारण करत आले, त्या शरद पवारांना फक्त 10 जागा मिळतात, हे मला समजण्यापलीकडे आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीला काँग्रेसचे सर्वात जास्त 13 खासदार निवडून आले. एका खासदारामागे 5 ते 6 आमदार असतात. सर्वच्या सर्व सहा नाही, पण तीन-चार आमदार विजय होतील. त्या काँग्रेसचे विधानसभेत 15 आमदार आले. शरद पवार यांचे 8 खासदार निवडून आले होते, त्यांचे फक्त 10 आमदार निवडून येतात. लोकसभेला अजित पवारांचा एक खासदार निवडून आला, त्यांचे विधानसभेला 42 आमदार येतात. चार महिन्यात लोकांच्या मनात असा काय फरक पडला? हा संशोधनाचा विषय आहे.
राज ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींना मी पाठिंबा दिला. त्यानंतर त्यांचा विरोध केला. माझ्या मागे ईडी लावली म्हणून भूमिका बदलली अशी चर्चा झाली. आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मी कोहिनूर मिल आणि ईडीची कहाणी स्पष्ट करतो. 2005 साली एकदा वर्तमानपत्रांत बातमी वाचली की, केंद्राच्या एनटीसीच्या गिरण्या विका आणि कामगारांना त्यांचा पगार द्या, असे कोर्टाने सांगितले. त्याची निविदा निघाली. त्यानंतर माझ्या मित्राने निविदा भरली. आम्हाला निविदा मिळाली. 500 कोटी रुपये भरायचे होते. आमच्याकडे पैसे नव्हते. आम्ही आयएल अँड एफएस कंपनीद्वारे पैसे भरले. त्यानंतर कोर्टात प्रकरण गेल्याने मी आणि माझा भागीदार यातून बाहेर पडलो. ज्यावेळेस मी ईडीची नोटीस पाहिली तर त्यात कोहिनूरविषयी लिहिलेले होते, पण मला कळले नाही की, माझा यात काय संबंध? त्यावेळी ती माणसे मला भेटली आणि मला म्हणाली की, तुम्हाला पैसे आले आणि तुम्ही ते घेतले. त्यावेळी आम्ही त्याचा कर भरला होता आणि तिथेच आम्ही त्यातून बाहेर पडलो. मग मी माझ्या सीएला विचारले की नेमके प्रकरण काय आहे? तेव्हा तो मला म्हणाला की, तुम्ही कराचे पैसे दिले, पण तुमच्या भागीदाराने ते न भरता बाहेरच्या बाहेर फिरवले. ते कंपनीपर्यंत गेलेच नाही. मग मी परत कर भरला. इथेच विषय संपला.
भुमिका बदलण्याच्या आरोपावर राज ठाकरे पुढे म्हणाले की, 1966 साली शिवसेनेचा जन्म झाला. शिवसेनेने प्रजा समाजवादी पक्ष ते मुस्लीम लीग सोबत युती केली. पुढे काँग्रेससोबत युती केली होती. त्या त्या वेळेला गरज बघून युती केली. त्यांनी सरकार बनवले. सर्व राजकीय पक्षांनी भूमिका बदलल्या. वाट्टेल त्या युत्या केल्या. त्या चालतात. पण त्यांनी केले की प्रेम, आम्ही केला की बलात्कार. हा कुठला न्याय? भाजपाने महाराष्ट्रात ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्या सगळ्यांना पुढे पक्षात घेतले आणि त्यांना मंत्री केले. नारायण राणे, गणेश नाईक, विजयसिंह मोहिते-पाटील, हर्षवर्धन पाटील, अशोक चव्हाण आज ज्यांच्यावर आरोप केले, ते मंत्रिमंडळात आहेत. मी जे बोललो, ते कधी मागे घेतले नाही. जे बोललो होतो त्याला आधार असतो. जे चांगले कराल त्याला चांगले बोलतो, वाईट कराल त्यावर बोललो. फडणवीसांनी, किरीट सोमय्यांनी किती लोकांवर आरोप केले, ते सगळे भाजपामध्ये आले. लोक हल्ली देव पाण्यात ठेवून बसतात की किरीट सोमय्यांनी किंवा फडणवीसांनी आरोप केले की, मला पक्षात घेतील. पुढे मंत्री करतील. एवढा चिखल झाला आहे, पण त्यांना कुणी पत्रकार विचारणार नाही, असे सांगत भूमिका बदलतो. या आरोपांवर राज ठाकरेंनी भाष्य केले. येत्या काळात पक्षात खालपासून वरपर्यंत आचारसंहिता आणणार आहे. पुढील 15 दिवसांत प्रत्येकाला जबाबदारी आणि आचारसंहिता आखून देईन. त्यासोबत पक्षातील पदाची नावे बदलली जातील, मी अनेक पराभव पाहिले. पराभवाने खचलो नाही आणि विजयाने हुरळून गेलो नाही. खचलेल्यांचे नेतृत्व मला करायचे नाही. माझ्यासोबत राहायचे असेल तर ठाम राहा. या राज्यातील मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी जे करायचे आहे ते मी करणार, ते आपले स्वप्न आहे. वेळ लागेल, पण करणार हे नक्की असे सांगत राज यांनी पक्ष संघटनेत बदलाचे संकेत दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top