मुंबई- कर्नाळा-साई-चिरनेर न्यू टाऊन या तिसर्या मुंबईनंतर आता वाढवण बंदरानजीक चौथी मुंबई उभारण्यात येणार आहे. यासाठी १०७ गावांतील ५१२ चौरस किमी क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा प्रस्ताव एमएसआरडीसी अर्थातमहाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने राज्य सरकारकडे सादर केला आहे.
नीती आयोगाने मुंबई शहराला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात आर्थिक विकास केंद्र म्हणजेच ग्रोथ हब उभारली जाणार आहेत. त्यातच आता देशातील सर्वात मोठे बंदर वाढवण येथे उभारले जात आहे. डहाणू तालुक्यात वाढवण आणि पालघर तालुक्यात केळवा येथे दोन विकास केंद्र उभारण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच एमएसआरडीसीची नियुक्ती केली होती. त्यानुसार डहाणू तालुक्यातील ११ आणि पालघर तालुक्यातील ३ गावांमध्ये ही विकास केंद्रे साकारली जाणार होती. यातील वाढवण विकास केंद्र हे ३३.८८ चौ. किमी, तर केळवा केंद्र ४८.२२ चौ. किमी क्षेत्रावर उभारण्याचे प्रस्तावित होते.वाढवण बंदराच्या प्रभाव क्षेत्रातील तब्बल १०७ गावांमध्ये आणि ५१२ चौरस किमीच्या प्रदेशात चौथी मुंबई विकसित करण्यासाठी एमएसआरडीसीने प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव जानेवारीमध्येच एसआरआरडीसीने राज्य सरकारकडे पाठविला आहे. या प्रस्तावानुसार चौथ्या मुंबईची हद्द वाढवण बंदराच्या क्षेत्रापासून ते तलासरीपर्यंत विस्तारलेली असेल,अशी माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली.