माऊलींच्या जयघोषात पालख्यांची रिंगण संपन्न

माळशिरस -माऊली माऊलीच्या जयघोषात आज सकाळी लाखो वारकरांच्या उपस्थित श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दूसरे गोल रिंगण खुडूस, माळशिरस फाटा येथे उत्साहात पार पडले. माळशिरस येथून आज पहाटे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने दूसरा गोल रिंगणासाठी खुडूस फाटाकडे आगेकूच केली होती. तर तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण माळीनगर येथे पार पडले.खुडूस फाटा येथे बाळासाहेब राजाभाऊ आणि रामभाऊ चोपदारांनी रिंगणात मानाच्या दिड्यांना सोडले. त्यानंतर भोंपळे दिंडीतील मानाच्या जरीपटक्याने रिंगण मैदानाला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. माऊलीच्या अश्वांनी दौडण्यास सुरुवात करताच लाखो उपस्थितांनी टाळ्या वाजवत माऊली माऊलीचा गजर सुरू केला. अश्वाने दोनच मिनीटांत तीन फेऱ्या पूर्ण करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. रिंगण पूर्ण होताच उपस्थितांची अश्वांच्या टाचेखालील माती कपाळावर लावण्यासाठी झुंबड उडाली होती. रिंगणाचे अश्व विसावताच वारकरी मैदानात उतरले, दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ रंगले. हुतुतू, गड्यास गडी, हमामा, सुरपाट, कबड्डी, खो-खो, फुगडी अशा खेळांनी वारकर्‍यांमध्ये चैतन्य निर्माण झाले. चोपदारांच्या निमंत्रणानंतर उडीच्या कार्यक्रमासाठी सर्व दिंड्या पालखीच्या सभोवती गोलाकार बसल्या. टाळ, मृदुंगाच्या साथीने ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा गजरात आसमंत व्यापून टाकणारा नादब्रह्म सुरू झाला.तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण आज सकाळी माळीनगर येथे हरिरामाच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी अश्वांनी रिंगणाच्या दोन फेर्या पूर्ण केल्या, यावेळी मोठी गर्दी झाली होती. आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या दिशेने निघालेल्या सर्व पालख्या पंढरपुरात १६ जुलैपर्यंत दाखल होणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top