केजरीवाल मोदींसारखा खोटे बोलतात! राहुल गांधींची टीका

नवी दिल्ली दिल्लीचे आपचे नेते अरविंद केजरीवालही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यसारखा सतत खोटा प्रचार करत असतात. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आपल्या पहिल्याच प्रचार सभेत अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजपा व आप हे एकाच प्रकारचा प्रचार करत असल्याचे म्हटले. त्यावर आपनेही पलटवार केला आहे.

नवी दिल्लीच्या सीलमपूर विभागात आयोजित प्रचार सभेत राहुल गांधी म्हणाले की, ज्या प्रकारे मोदी खोटा प्रचार करतात त्याचप्रकारे केजरीवालही करतात. केजरीवाल दिल्लीला पॅरिस बनवण्याच्या गोष्टी करत होते. आज काय आहे? प्रदूषणामुळे दिल्लीच्या रस्त्यांवर चालणेही अवघड झाले आहे. मी जेव्हा दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक यांच्या हितासाठी जातीय जनगणनेचा विषय काढला होता तेव्हा हे दोघे त्याच्या समर्थनार्थ एकही शब्द बोलले नाहीत. त्यांना समाजातील मागासवर्गाला सत्तेत भागीदारी द्यायचीच नाही. केजरीवाल अदानी यांच्या विरोधात एकही शब्द बोलत नाहीत. केजरीवालांनी सगळ्यांच्या समोर हे सांगावे की ते आरक्षणाची व्याप्ती वाढवू इच्छित आहेत.

राहुल गांधी यांच्या या भाषणावर आपनेही पलटवार केला आहे. अरविंद केजरीवाल म्हणाले की, राहुल गांधी हे केवळ आपला पक्ष वाचवण्याची धडपड करत आहेत. आम्ही देश वाचवण्यासाठी लढत आहोत. आपल्या एक्स पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी काँग्रेसच्या विरोधात काही बोललो तर त्याचे उत्तर भाजपाकडून येते. त्यामुळे दिल्लीत भाजपा व काँग्रेसच्या जुगलबंदीवरुन आता पडदा उठला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top