न्यूयॉर्क- इंडियाना जोन्स मलिकेतील हॉलिवूड चित्रपट केवळ रोमांचक कथेमुळेच प्रसिद्ध नाहीत तर या सिनेमांमधील प्रत्येक व्यक्तिरेखा आणि त्यांच्याशी संबंधित प्रतिकांमुळेही अत्यंत लोकप्रिय आहेत.याच ‘इंडियाना जोन्स’ सीरिजचा १९८४ मध्ये ‘द टेंपल ऑफ डूम’ हा चित्रपट आला होता. अभिनेता हॅरिसन फोर्ड यांनी या चित्रपटात एक टोपी घातली होती. याच टोपीची नुकतीच ६,३०,००० डॉलर म्हणजे ५.२८ कोटी रुपयांहून अधिक किंमतीत विक्री झाली आहे. लिलावाद्वारे बोली लावून ही टोपी विकली गेली.
अभिनेता हॅरिसन हा इंडियाना जोन्सच्या व्यक्तिरेखेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. मात्र ८० च्या दशकातील अगदी साधी असणारी त्यांची टोपी त्यांच्या चाहत्यांनी तिची बोली लावून तब्बल ५.२८ कोटी रुपये एवढ्या मोठ्या रकमेला विकत घेतली. यावरून हॅरिसन यांचा प्रेक्षकांवर किती पगडा होता आणि त्यांच्या वस्तूंचे लोकांना अजूनही किती प्रचंड वेड आहे, हे यातून दिसून येते.अशा प्रकारच्या लिलावात दुर्मिळ ऐतिहासिक वस्तू मांडल्या जातात. या वस्तूंमुळे केवळ सिनेमाच्या आठवणीच जागवल्या जात नाहीत.तर त्याचे ऐतिहासिक महत्त्वही अधोरेखित होते.या टोपीसोबतच त्या चित्रपटाशी संबंधित अन्य वस्तूही चांगल्या रकमेला विकल्या गेल्या आहेत.