नवी दिल्ली – हलकी वाहने चालवण्याचा म्हणजेच एलएमव्ही परवाना धारक व्यक्ती साडेसात हजार किलो पर्यंतच्या वजनाची जड वाहने चालवू शकतात असा महत्त्वपूर्ण निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने हा निर्णय दिला. त्यामुळे हलक्या वाहनाच्या परवान्यावर आता छोटे ट्रक टेम्पो चालवता येणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयात बजाज अलांयस जनरल इन्शुरन्स कंपनी विरुद्ध रंभा देवी व अन्य या खटल्यासह इतर ७६ खटल्यांच्या सुनावणी दरम्यान घटनापीठाने हा निर्णय दिला.
या घटनापीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय, पीएस. नरसिंहा, पंकज मिथल व मनोज मिश्रा होते. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, साडेसात हजार किलोपेक्षा कमी असलेली सर्व वाहने ही हलकी वाहने आहेत. त्यामुळे हलकी वाहने चालवण्याचा परवाना असलेला व्यक्ती ही वाहने चालवू शकतात. हलक्या वाहनांच्या परवानाधारकांकडून जड वाहने चालवल्यामुळे झालेल्या अपघातांची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र विमा कंपन्यांकडून हा मुद्दा वारंवार उपस्थित केला जातो. घटनापीठासमोर एकूण ७६ खटल्यांची सुनावणी करण्यात आली. हा मुद्दा वाहन चालकांच्या उपजिवीकेशीही संबंधित आहे. हे सर्व लक्षात घेऊन हा निर्णय दिला आहे असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.