स्विगीचा तिमाही तोटा आणखी ७९९ कोटी रुपयांपर्यंत वाढला

नवी दिल्ली- झोमॅटो व झेप्टोला टक्कर देऊ पाहणाऱ्या अन्न आणि किराणा माल वितरण क्षेत्रातील स्विगी कंपनीचा तिमाही तोटा आणखी वाढला आहे.स्विगीचा तिसर्‍या तिमाहीत एकूण तोटा ७९९.०८ कोटींवर पोहचला आहे.

स्वीगीने आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. स्विगीला या निकालांनी दणका दिला आहे. या कंपनीचा एकूण खर्च ३७०० कोटी रूपयांवरून ४८९८.२७ कोटी रूपयांवर पोहचला आहे. तसेच चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत नव्याने सूचीबद्ध झालेल्या स्विगीचे कामकाजातून मिळणारे उत्पन्न ३१ टक्क्यांनी वाढून ३,९९३ कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत स्विगीचा तिमाही तोटा ५२४ कोटी रुपये होता. प्रतिस्पर्धी झोमॅटो आणि झेप्टोशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने या व्यवसायात गुंतवणूक केली आहे. त्याचाही परिणाम स्विगीच्या नफ्यावर झाला आहे. स्विगीची एकूण ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (GOV) गेल्या वर्षीच्या तुलनेत ३८ टक्क्यांनी वाढून १२,१६५ कोटी रुपये झाली आहे.
दरम्यान,स्विगीचे व्यवस्थापकीय संचालक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष माजेटी यांनी म्हटले आहे की, ‘सणासुदीच्या तिमाहीत आम्ही ग्राहकांसाठी विशेष ऑफर देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.स्विगीचा क्विक कॉमर्स व्यवसाय असलेल्या स्विगी इन्स्टामार्टने ग्राहकांचा वाढता खर्च आणि नवीन शहरांमध्ये विस्तार यामुळे जीओव्हीमध्ये वार्षिक ८८ टक्क्यांनी वाढ नोंदवून ३,९०७ कोटी रुपये केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top