नवी दिल्ली – प्रकृतीसाठी हानिकारक असलेली सिगारेट आणि अन्य तंबाखुजन्य पदार्थ तसेच शीतपेये आदी पदार्थांवरील जीएसटीत आणखी वाढ करण्याची शिफारस जीएसटी दर निश्चितीसाठी गठीत करण्यात आलेला मंत्री गट सरकारला करणार आहे. या पदार्थांवर सध्या जीएसटीच्या कर टप्प्यांमधील सर्वात जास्त २८ टक्के कर आकारला जातो. त्यात आणखी वाढ करून ३५ टक्के असा विशेष दर लावावा अशी शिफारस करण्यात येणार आहे.
बिहारचे उप मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील या मंत्रिगटाची काल बैठक झाली. त्यात तंबाखूजन्य पदार्थांबरोबरच तयार कपड्यांवरील जीएसटीच्या कररचनेमध्ये सुधारणा करण्यावर एकमत झाले आहे. त्यानुसार दीड हजार रुपयांपर्यंतच्या तयार कपड्यांवर ५ टक्के, दीड हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत कपड्यांवर १८ टक्के, तर १० हजाराहून जास्त किमतीच्या तयार कपड्यांवर २८ टक्के जीएसटी लावण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली जाणार आहे. मंत्रिगटाच्या या शिफारशींवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेत चर्चा होऊन अंतिम निर्णय होणार आहे.