मालवण – गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेली किल्ला सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. काल मंगळवारपासून सिंधुदुर्ग किल्ला दर्शन सेवेला आता सुरुवात झाली आहे,अशी माहिती सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली.
मंगेश सावंत यांनी सांगितले की,सिंधुदुर्ग समुद्र किनारपट्टी भागातील पर्यटन सेवा २५ मे पासून बंद होती.दरवर्षी बंद होणारा पर्यटन हंगाम पुन्हा १ सप्टेंबरपासून सुरू होतो. मात्र,समुद्रातील वाऱ्याचा वेग व पाऊस यामुळे यंदा उशिरा हंगामाची सुरुवात होत आहे. गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी तसेच राज्याच्या विविध भागातून पर्यटकही दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.याच पार्श्वभूमीवर पर्यटकांना किल्ले सिंधुदुर्गला भेट देता यावी,यासाठी कालपासून किल्ले प्रवासी होडी वाहतूक सेवा सुरू केली आहे. त्यासाठी आता मार्च महिन्यात संपलेले परवाना नूतनीकरण करण्यासाठी बंदर कार्यालयाकडून आवश्यक कागदपत्रांमध्ये नौकांचे सर्वेक्षण अनिवार्य आहे.या सर्वेक्षणाचे शुल्क किल्ला होडी वाहतूक संघटनेच्या सदस्यांना एप्रिलमध्ये ऑनलाईन भरावे लागणार आहे.