पाटणा – बिहारच्या राज्य सहकारी बँकेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी ईडीने राजदचे आमदार अलोक कुमार मेहता यांच्या निवासस्थान आणि कार्यालयावर छापे टाकले. बिहार, कोलकता, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील जवळपास १८ ठिकाणी ईडीने झडती घेतली. या छापेमारीत बँकेत सुमारे ८५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, रिझर्व्ह बँकेनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे.
ईडीच्या कारवाईत मेहता यांच्या विविध कार्यालयांची झडती घेण्यात आली. त्यामध्ये वैशाली शहर विकास सहकारी बँक आणि इतर संबंधित संस्थांचा समावेश होता. मेहता हे वैशाली शहर विकास सहकारी बँकेचे प्रवर्तक असून बिहारच्या उजियारपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. याबाबत राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी यांनी भाजपावर आरोप करत म्हटले की, ईडी, सीबीआय आणि अन्य तपास एजन्सींचा वापर विरोधी पक्षाच्या नेत्यांविरोधात केला जात आहे.