संविधान प्रतिकृतीची विटंबना! परभणी बंदला हिंसक वळण

परभणी – परभणीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेच्या प्रतिमेची विटंबना झाल्याने अनुयायांनी आज परभणी बंदची हाक दिली होती. या बंदला हिंसक वळण लागले. जाळपोळ, दगडफेक, तोडफोड झाल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांना सायंकाळी स्थिती आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र तणाव कायम आहे. विटंबना करणार्‍या माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती. एका माथेफिरूने काल सायंकाळी साडेपाच वाजता त्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली.
संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर शहरातील आंबेडकरी अनुयायी संतप्त होऊन मोठ्या संख्येने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात जमा झाले. त्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली आणि संतप्त होऊन तिथे उभ्या असलेल्या काही गाड्यांवर दगडफेक केली. परभणी रेल्वे स्टेशनवर जाऊन मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस रोखून ठेवली. तब्बल अर्धा तास रेल रोको आंदोलन केल्यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने रेल्वे सोडण्यात आली. मुंबईकडे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस परभणी स्टेशनमधून रवाना झाली.
सकाळपासूनच शहरातील अनेक भागांत बंद पाळण्यात आला. बाजारपेठा, दुकाने, शाळा-महाविद्यालयात शुकशुकाट होता. मात्र दुपारी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे जमायला सुरुवात केली आणि संतप्त आंबेडकरी अनुयायांनी ताडकळस येथे धानोरा टी पॉईंट पोलीस स्टेशनच्या समोर निषेध रॅली काढत रास्तारोको केला. संतप्त आंदोलकांनी परभणी शहरातील रेल्वे स्टेशन रोडबाहेर ठेवलेले पाईप तीन ठिकाणी पेटवून दिले. या भागातील वीजपुरवठा बंद केला होता. जमावाने दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केली. वाहनांवर दगडफेक केली. बॅनर फाडून रस्त्यावर पेटवून दिले. पोलिसांनी जमावाला हटवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यांनी जमावावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि सौम्य लाठीमार केला. पोलिसांचा ताफा वाढवला. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते, आंदोलक यांची बैठक घेत आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. सर्वांना शांततेचे आवाहन केले. ही बैठक सुरू असताना अचानक महिलांचा एक घोळका जिल्हाधिकारी कार्यालयात घुसला आणि त्यांनी तोडफोड सुरू केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. शहरात जमावबंदीचे आदेश काढले आहेत. परिसरात 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई केली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. सर्व टेलिफोन, एसटीडी, भ्रमणध्वनी, आयएसडी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स केंद्र, ध्वनीक्षेपके आणि इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचेही आदेश
दिले आहेत.
वंचितचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बाबासाहेबांच्या पुतळ्याची किंवा दलित अस्मितेच्या प्रतिकाची अशी तोडफोड किंवा विटंबना होण्याची ही पहिलीच घटना नाही. वंचित बहुजन आघाडीचे परभणी जिल्ह्यातील कार्यकर्ते प्रथम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी केलेल्या निषेध आणि निदर्शनामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून, एका समाजकंटकाला अटक केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नका. शांतता राखा.
या घटनेचे पडसाद वसमत,जिंतूर आणि पुण्यात देखील पडले. या ठिकाणी देखील आंबेडकर अनुयायांकडून निषेध मोर्चा काढण्यात आला. जालन्यातील परतूर आणि आंबड आगारातील परभणीकडे जाणार्‍या 7 बसच्या फेर्‍या रद्द केल्या. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला होता.
तर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, परभणी शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणार्‍या इसमाचा जाहीर निषेध करतो. समाजात अपप्रवृत्ती बळावत चालली आहे. सरकारने लोकभावना प्रक्षोभित करणार्‍या या समाजकंटकावर तत्काळ कारवाई करावी जेणेकरून अशा घटनांना भविष्यात आळा बसेल. खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, परभणी शहरात एका समाजकंटकाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार संतापजनक आहे. हे कृत्य करणार्‍या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. संविधानाचा अवमान करणार्‍यांना त्यातील समतेची तत्वे अमान्य आहेत असेच म्हणावे लागेल. या घृणास्पद कृत्याचा निषेध करते.
ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील म्हणाले की, मी आंदोलकांना सातत्याने शांत राहा, असे आवाहन करत आहे. मी सध्या शिवाजी चौकात आहे. काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. पण परिस्थिती नियंत्रणात आहे. कोणीही घाबरुन जाऊ नका. काल झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आपण शांततेने हे आंदोलन करावे.
ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव म्हणाले की, आंबडेकरी अनुयायींना आवाहन करतो की, काल झालेली घटना ही दुर्दैवी आहे. या घटनेचा मी निषेध करतो. पण आता जी काही परिस्थिती आहे, ती शांततेने हाताळावी. या घटनेचा निषेध नोंदवताना इतरांना काही त्रास होणार नाही याचीही आपण काळजी घेतली पाहिजे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top