श्रीलंकेतील निवडणुकीत आश्वासन सत्तेवर आलो तर अदानीला घालवू

कोलंबो – दोन वर्षांपूर्वीची राजकीय उलथापालथ, अंतर्गत यादवी आणि आर्थिक अराजक यात सापडलेल्या श्रीलंकेत उद्या राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक होत आहे. ताज्या सर्वेक्षणानुसार, नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे अध्यक्षपदासाठीचे उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. ते चीन समर्थक मानले जातात. विशेष म्हणजे निवडणूक प्रचारात अदानी प्रकल्पाचा मुद्दा महत्त्वाचा झाला आहे. आम्ही सत्तेवर आलो तर अदानीला घालवून देऊ, असे आश्वासन ते प्रत्येक प्रचार सभेत देत आहेत.
अनुरा दिसानायके यांच्याशिवाय विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा, विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांचे पुत्र नमल राजपक्षे हे आणखी तीन मोठे उमेदवार रिंगणात आहेत. सर्वेक्षणात साजित प्रेमदासा दुसर्‍या क्रमांकावर, रानिल विक्रमसिंघे तिसर्‍या क्रमांकावर, नमल राजपक्षे चौथ्या क्रमांकावर आहेत. या निवडणुकीत एकूण 38 उमेदवार मैदानात असले तरी मुख्य लढत दिसानायके, प्रेमदासा, विक्रमसिंघे यांच्यातच होणार आहे.
जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके भारतविरोधी म्हणून ओळखले जातात. 1980 च्या दशकात भारताने श्रीलंकेत एलटीटीईविरुद्ध लढण्यासाठी शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा त्यांच्या पक्षाने विरोध केला होता. अलिकडच्या काळात जेव्हीपीने आपली भारतविरोधी भूमिका सौम्य केली असली तरी अनुरा यांनी निवडणूक प्रचारात अदानींविरोधात वक्तव्य करून नवा वाद सुरू केला आहे. अदानी समूह श्रीलंकेत पवन ऊर्जा प्रकल्प उभारत आहे. या प्रकल्पात अदानी समूह 442 दशलक्ष डॉलर (सुमारे 367 कोटी) गुंतवणूक करणार आहे. अनुरा दिसानायके यांनी अदानी प्रकल्प हा श्रीलंकेच्या ऊर्जा स्वातंत्र्याला धोका असल्याचे म्हटले आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे आश्वासन दिल्याने अनुरा खासकरून तरुणांमध्ये लोकप्रिय आहेत. देशाच्या बिघडलेल्या आर्थिक स्थितीचे मुख्य कारण भ्रष्टाचार आहे, असे तरुणांना वाटत आहे. त्यामुळे अनुरा यांची लोकप्रियता
वाढली आहे.
75 वर्षांचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हे अपक्ष उमेदवार म्हणून आगामी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यांनी श्रीलंकेतील उजव्या विचारसरणीच्या युनायटेड नॅशनलिस्ट पार्टीचा राजीनामा दिला आहे. विक्रमसिंघे त्यांच्या दोन वर्षांच्या कार्यकाळातील राजकीय आणि आर्थिक स्थैर्याचा दाखला देत आहेत. दुसर्‍या बाजूला श्रीलंकेत दोन वर्षांपूर्वी आलेल्या आर्थिक संकटांची झळ अजूनही नागरिकांना बसत आहे. त्यामुळे आर्थिक बाब हाच निवडणुकीतील मुद्दा असेल. भारताच्या बाजूने प्रेमदासा हे एकमेव उमेदवार बोलत आहेत, त्यांनी श्रीलंकेतील अंतर्गत युद्धात भारताच्या हस्तक्षेपासंबंधीच्या घटनेतील दुरुस्तीचे समर्थन केले आहे. त्यामुळे श्रीलंकेत मोठ्या प्रमाणावर असलेल्या तमिळींचा त्यांनाच पाठिंबा आहे. या निवडणुकीसाठी 1 कोटी 60 लाख मतदारांनी नोंदणी केली. उद्या मतदानानंतर रविवारी निवडणुकीचा निकाल
लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top