विधान भवनात प्रथमच क्रिकेटपटूंचा सत्कार संघाला 11 कोटींचे बक्षीस! भव्य कार्यक्रम

मुंबई – टी-20 वर्ल्डकप जिंकणार्‍या भारतीय संघाचे काल वानखेडे स्टेडियम येथे भव्य स्वागत झाल्यानंतर आज या संघातील महाराष्ट्राच्या 4 खेळाडूंचा राज्य सरकारच्या वतीने विधिमंडळात सत्कार करण्यात आला. विधान भवनाच्या सभागृहात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटीचे बक्षीस देण्यात आले. महाराष्ट्र सरकारच्या वतीने विश्वविजेत्या टीम इंडियालाही 11 कोटी रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले.
अधिवेशनाच्या काळात जिथे आरोप-प्रत्यारोपांचे चौकार-षटकार हाणले जातात, त्या विधान भवनात आज वेगळेच वातावरण होते. विश्वविजेत्या भारतीय संघातील कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या महाराष्ट्राच्या चार खेळाडूंच्या सत्कारासाठी विधान भवनाचा सेंट्रल हॉल सजला होता. विधिमंडळाच्या प्रवेशद्वारावर ढोलताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने या खेळाडूंचे औक्षण करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर, विधान परिषद उपसभापती नीलम गोर्‍हे, बीसीसीआयचे खजिनदार असलेले आमदार आशिष शेलार, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार उपस्थित होते. यावेळी भारत माता की जय, मुंबईचा राजा, रोहित शर्मा या घोषणांनी सभागृह दुमदुमून गेले. अनेक आमदारांनी भारतीय तिरंगेही सभागृहात झळकवले. क्रिकेटपटूंना शाल, पुष्पगुच्छ, ट्रॉफी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देण्यात आली.
या सत्काराला उत्तर देताना भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने मराठीतून भाषण केले. तो म्हणाला की, आमच्यासाठी विधान भवनात असा कार्यक्रम केला, त्याबद्दल आभार. काल मुंबईमध्ये जे काही पाहिले, ते स्वप्नवत होते. विश्वचषक जिंकणे आमचे स्वप्न होते. 2023 मध्ये आमची संधी हुकली. सूर्यकुमार, दुबे किंवा माझ्यामुळे हे झाले, असे नाही तर हे सर्वांमुळे झाले. सर्व सहकारी माझ्यासोबत होते. त्यामुळे हे होऊ शकले. प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता. सूर्यकुमारने सांगितले की, तो कॅच त्याच्या हातात बसला नसता. बरे झाले हातात कॅच बसला, नाहीतर त्याला मी पुढे बसवले असते.
फायनल सामन्यात अंतिम क्षणी अविस्मरणीय झेल घेणारा सूर्यकुमार यादव मनोगत मांडताना म्हणाला की, इथे असलेल्या सर्वांना भेटून चांगले वाटते. हा प्रसंगही मी कधीच विसरू शकत नाही. सर्वांचे खूप खूप आभार. माझ्याकडे सध्या बोलण्यासाठी शब्द नाहीत. तुमच्या प्रेरणेने आपण आणखी एक विश्वचषक नावावर करू.
यावेळी राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्रातील चार खेळाडूंना एक कोटी रुपयांचे बक्षीसदेखील देण्यात आले. तसेच भारतीय संघाला 11 कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले. भारतीय संघांचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रे आणि संघ व्यवस्थापन अरुण कानडे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी राजकीय नेत्यांनीही आपल्या भाषणातून फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भारतीय संघात चार मुंबईकर खेळाडू होते, याचा विशेष अभिमान आहे. तर, संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हेही आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत. मुंबई ही क्रिकेटची पंढरी आहे. तर टी-20 वर्ल्ड कपमधून रोहितने निवृत्ती घेतली असली तरी त्याची आठवण कायम स्मरणात राहील.
राजकारण हेदेखील क्रिकेटसारखेच आहे. कोण, कधी, कोणाची विकेट घेईल, सांगता येत नाही. आमच्या 50 जणांच्या टीमने दोन वर्षांपूर्वी एकाची विकेट घेतली होती, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. तुमच्या खेळामुळे ज्या पद्धतीने सुख आणि समाधान चाहत्यांच्या चेहर्‍यावर दिसते. तसेच सुख आणि समाधान राज्यातील जनतेच्या चेहर्‍यावर दिसावे, एवढीच आमची अपेक्षा असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ठाकरेंना टोला लगावल्यानंतर हा गमतीचा भाग असल्याचे, असे सांगायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत. महाराष्ट्रातील चारही खेळाडूंसह भारतीय संघाने ज्या प्रकारचा खेळ दाखवला ते अभिमानास पात्र आहेत. आमच्या राजकारणातील खेळ देखील वेगळा आहे. राजकारणात कोण, कोणाची कधी कॅच घेईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आम्हाला देखील चांगली बॅटिंग करावी लागते, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. आमच्या सभागृहातील अनेक सदस्य देखील अनेक वेळा चौकार-षटकार मारत असतात, असेही शिंदे म्हणाले.
आपल्या महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे, सभागृहातील आपले अंपायर राहुल नार्वेकर, व्हाईस कॅप्टन अजित पवार, थर्ड अंपायर नाही म्हणता येणार त्यांना अंपायरच म्हणावे लागेल, नीलम गोर्‍हे अशी भाषणाची सुरुवात करून उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, संघाच्या कर्णधारासह चार खेळाडूंचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. कर्णधार रोहित शर्माने एकाच दिवशी आनंद आणि दु:खही दिले. वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून आनंद आणि निवृत्ती घेऊन दु:ख दिले. याआधी जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी स्वागत केले. मुख्यमंत्र्यांनी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी आमदार प्रताप सरनाईकही उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top