विठुरायाच्या मूर्तीची झीज!पुन्हा इपॉक्सी लेप लावणार

पंढरपूर – पंढरपूरच्या मंदिरातील विठुरायाच्या मूर्तीची पुन्हा मोठ्या प्रमाणात झीज होत असल्याचे उघड झाले आहे. एका महिन्यांपूर्वी पुरातत्त्व खात्याच्या रासायनिक विभागाकडून विठ्ठल मूर्तीची पाहणी करण्यात आली होती. या पाहणीचा अहवाल आला असून देवाचे पाय आणि कमरेच्या मागचा भाग या ठिकाणी झीज झाल्याचे त्यात म्हटले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विठ्ठलाच्या मूर्तीवर इपॉक्सी लेप लावावा लागणार आहे. यापूर्वी चार वर्षांपूर्वी असा लेप लावण्यात आला होता.

आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा होऊन पुरातत्त्व विभागाचा अहवाल राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य शासनाकडून परवानगी मिळाल्यानंतर मंदिर समितीच्या बैठकीत विठ्ठल मूर्तीला लेप लावण्याचा दिवस ठरवण्यात येणार येईल, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.यापूर्वी २०२०-२१ मध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्तीला एपॉक्सीचा लेप दिला होता. या काळात कोरोना असल्याने मंदिर बंदच होते. आता पुन्हा एकदा विठुरायाच्या मूर्तीला लेप लावायचा असल्याने नियोजन करावे लागणार आहे.

विठ्ठल मंदिरात सुरू असलेल्या मंदिर जतन व संवर्धनाच्या कामांमध्ये विठ्ठल गाभाऱ्यातील दगडांनाही रासायनिक लेप लागावा लागणार आहे. यासाठी सुरुवातीला रासायनिक द्रव्याने दगड साफ करावे लागणार आहेत. यानंतर ते पाण्याने धुवावे लागणार आहे. त्यानंतर पुन्हा या दगडांना रासायनिक लेपन करावे लागणार आहे. यावेळी दगडातून विषारी वायू बाहेर पडण्याची शक्यता असल्याने लेपन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आठ ते दहा तास गाभारा बंद ठेवावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्‍या बैठकीत याबाबतचा निर्णय होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top