वैभववाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उपविभागातील वाभवे वैभववाडी नगरपंचायतीकडे प्राप्त झालेल्या १३ कोटी ६२ लाख रूपयांच्या विकास निधीतून शहरात एकही विधायक आणि दर्जेदार काम झाल्याचे दिसून येत नाही.ही कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याने हा निधी नेमका कुणाच्या घशात गेला? याचे स्पष्टीकरण सत्ताधाऱ्यांनी द्यावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक रणजित तावडे यांनी केली आहे तसेच शहरातील गटाराचे अर्धवट काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण न केल्यास भाजपच्या शहर प्रवक्त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.
रणजित तावडे पुढे म्हणाले की,चार-पाच दिवसांपूर्वी भाजपचे नवे शहर प्रवक्ते डॉ. राजेंद्र पाताडे यांनी वैभववाडी शहराच्या विकासासाठी १३ कोटी ६२ लाखांचा निधी प्राप्त झाल्याचे सांगून अनेक विकास कामे मार्गी लावल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अनेक विकासकामांची छायाचित्रेही प्रकाशित केली होती. मात्र पाताडे यांनी शहरातील नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, नगरपंचायतीने विकास नाही तर शहराला भकास केले आहे, शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही,सांडपाणी,
गटाराचे बांधकाम यासह कोणतीच कामे पूर्ण झालेली नाहीत, ५० लाखांच्या बंधाऱ्यात थेंबभर पाणी नाही.मग मिळालेले १३ कोटी ६२ लाख कुणाच्या घशात गेले याचे उत्तर डॉ.पाताडे यांनी द्यावे. शहरात नगरपंचायतीने अर्धवट ठेवलेल्या गटारामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.या गटाराचे काम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण न केल्यास नगरपंचायतीला टाळे ठोकून भाजपचे शहरप्रवक्ते डॉ.पाताडे यांच्या घरासमोर आंदोलन केले जाईल.’’ येथील ठाकरे शिवसेनेच्या संपर्क कार्यालयात ठाकरे गटाचे नगरसेवक व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद झाली.