वाडा- पावसाळा सुरू झाला की वाडा तालुक्यातील विविध प्रकारच्या रानभाज्यांना सुगीचे दिवस येतात. या रानभाज्यांमध्ये ‘शेवळं’ ही रानभाजी अनेकांची पसंती ठरली आहे. सध्या वाड्याच्या बाजारात याच भाजीला मोठी मागणी आहे. ही भाजी पोटाच्या विकारांवर गुणकारी असते. ग्रामीण भागात या भाजीला जंगली सुरण असेही म्हटले जाते.
जंगलात मिळणारी’शेवळं’ही रानभाजी पावसाळ्यातच जास्त प्रमाणात बाजारात येते.ही भाजी रोगप्रतिकारकशक्ती वाढवते. मूत्र आणि किडनीचे कार्य सुधारते. पोटाच्या विकारासाठी गुणकारी ठरत असल्यामुळेच या रानभाजीला अधिक महत्व आहे. या रानभाजीची एक जुडी २० ते ४० रुपयाला बाजारात मिळते. ही भाजी महाराष्ट्र,कर्नाटक,गुजरात आणि गोवा या राज्यातच मोठ्या प्रमाणात आढळते. ही भाजी विकत घेण्यासाठी बाजारात ग्राहकांची झुंबड उडत असते.