नवी दिल्ली – लग्नावेळी नवरीला दिले जाणारे दागिने आणि इतर वस्तूंवर फक्त तिचाच अधिकार आहे. लग्नाच्यावेळी मुलीच्या पालकांनी दिलेले ‘स्त्रीधन’, सोन्याचे दागिने आणि इतर वस्तूंची ती मुलगीच एकमात्र मालक आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. महिलेच्या पतीचाही ‘स्त्रीधन’वर अधिकार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे घटस्फोटानंतर स्त्री निरोगी आणि निर्णय घेण्यास सक्षम असेल तर तिच्या वडिलांचाही त्यांनी दिलेल्या ‘स्त्रीधन’वर अधिकार नाही.
घटस्फोटानंतर ‘स्त्रीधन’ संदर्भात दाखल केलेल्या एका खटल्याच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. तेलंगणा राज्यातील पडाळा येथील पी वीरभद्र राव यांच्या मुलीचे लग्न डिसेंबर १९९९ मध्ये झाले आणि हे जोडपे अमेरिकेला गेले. वीरभद्र राव यांनी लग्नात आपल्या मुलीला अनेक दागिने आणि भेटवस्तू दिल्या होत्या. लग्नानंतर अमेरिकेत महिला आणि तिच्या पतीमध्ये मतभेद झाले आणि १६ वर्षानंतर दोघांनी घटस्फोट घेतला. मुलीचे पुन्हा लग्न झाले. वीरभद्र राव यांनी आपल्या मुलीच्या पूर्वीच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करून ‘स्त्रीधन’वर आपला हक्क सांगितला.पूर्वीच्या सासऱ्यांनी एफआयआर रद्द करण्यासाठी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र त्यांना कोणताही दिलासा न मिळाल्याने त्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यावेळी न्यायमूर्ती जेके माहेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठाने सासरच्या लोकांविरुद्धचा खटला रद्द केला आणि सांगितले की, वडिलांना आपल्या मुलीचे ‘स्त्रीधन’ परत मागण्याचा अधिकार नाही.कारण त्यावर पूर्णपणे तिचा मालकी हक्क आहे.