कोल्हापूर – ‘साहित्यरत्न’ म्हणून उपाधी मिळविणार्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे तथा तुकाराम भाऊराव साठे यांचे स्मृती आणि स्फूर्ती सदन कोल्हापुरात साकारत आहे. राजारामपुरीत होणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे राज्यातील हे पहिलेच स्मृतिसदन आहे. त्यासाठी २ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर झाला असून कामही सुरू झाले आहे.१ ऑगस्ट २०२५ रोजी अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी या स्मारकाचे लोकार्पण करण्याचा प्रयत्न आहे.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती व स्फूर्ती सदन इमारत उभारणी करण्याचा संकल्प केला असून, त्यामध्ये परिसरातील विद्यार्थी, कष्टकरीवर्ग, संशोधक यांना वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका, प्रशिक्षण केंद्र इत्यादी शैक्षणिक सुविधा देण्यात येणार आहेत. यामधून परिसरातील नागरिकांना लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या लोकसाहित्याचा परिचय होईल.या स्मृती व स्फूर्ती सदनामध्ये तळमजला, त्यावरील एक मजला असून एकूण ८५५ चौ.मी.चे बांधकाम क्षेत्र आहे.पार्किंग,पहिल्या मजल्यावर ग्रंथालय,आर्ट गॅलरी,तसेच पहिल्या आणि दुसर्या मजल्यावर वाचनालय केले जाणार आहे.अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीपूर्वी स्मृतिसदन पूर्ण करून त्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.