पुणे- मागच्या काही दिवसात उत्तरेकडील शीत लहरींचा प्रभाव वाढला आहे. या शीत लहरींचा परिणाम आता राज्यावर चांगलाच जाणवत आहे. उत्तरेतील थंडीमुळे राज्यात गारठा वाढला आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान शुन्याखाली गेले आहे. दरम्यान, राज्यात पुढील तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
दुसरीकडे बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा सक्रीय झाल्याने दक्षिणेकडील राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात तापमानात काहीशी चढउतार होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. विदर्भात थंडीचा कडाका प्रचंड वाढला असून उत्तर महाराष्ट्रही पूर्णपणे गारठला आहे. जळगावात काल ८.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर बहुतांश ठिकाणी तापमान १० अंशांखाली आले होते. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात बुधवारी ८.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नांदेडमध्ये ७.९ अंशापर्यंत तापमानाची नोंद झाली. त्यानंतर नाशिक, बारामती, उदगीर, नागपूर जिल्ह्यात ९ अंशांवर तापमान गेले होते. जळगावमध्ये निचांकी तापमानाची नोंद झाली असून धाराशिव ८.६, नांदेड ८.९ अंश सेल्सियसवर होते.