पुणे – जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील आठवडी बाजार १ जानेवारी रोजी बंद ठेवण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी गंगाधर देशमुख यांनी दिली.
ग्रामपंचायतीच्या वतीने याबाबत एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.यामध्ये सर्व शेतकरी, व्यावसायिक,दुकानदार व ग्रामस्थांना आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.१ जानेवारी रोजी शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी देशभरातून कोरेगाव भीमा येथे मान्यवर,अनुयायी, मोठ्या संख्येने येत असतात. रांजणगाव गणपती येथील आठवडे बाजार दर बुधवारी भरत असतो. बाजार आणि शौर्य दिन एकाच दिवशी आले आहेत.त्यामुळे रांजणगाव गणपतीमार्गे जाणाऱ्या अनुयायांची वाढती संख्या लक्षात घेता ग्रामपंचायत रांजणगाव गणपती येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय सरपंच सुवर्णा वायदंडे, उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहमतीने घेण्यात आला असल्याचे गंगाधर देशमुख यांनी सांगितले.