रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहाटे थंडीची चाहुल जाणवत आहे.त्यामुळे बागायतदारांनी बदललेल्या वातावरणाचा अंदाज घेऊन आंबा-काजूच्या बेगमीच्या वेळापत्रकाची जुळवाजुळव सुरू केली आहे.
समुद्र किनारी भागातील हवेचा दाब गुरुवारी १०१२ हेप्टापास्कल इतका असल्याने सकाळी सौम्य थंडी व दुपारी उष्ण हवामान जाणवत आहे. दिवसभर बहुतांशी भागांमध्ये कमाल तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने, तर किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. यापुढेही जिल्ह्यातील हवामान अल्प प्रमाणात अंशतः ढगाळ राहील. रत्नागिरी जिल्ह्यातील कमाल तापमान काल २९ अंश होते.आज सकाळी दहा वाजता त्यामध्ये १ अंशाची वाढ झाली. तर दुपारपर्यंत तपामान ३२ अंशावर पोहचले होते.वार्याची दिशा आग्नेय व वायव्येकडून राहील. वार्याचा ताशी वेग साधारण राहील. त्यामुळे पुढील आठवड्यात बाष्पीभवनाच्या वेगात वाढ होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.गेले अनेक दिवस थंडीच्या प्रतीक्षेत असलेला बागायतदार पहाटे थंडी पडत असल्याने खूश झाला आहे. मात्र मात्र अद्याप किनारपट्टी भागात थंडी जाणवलेली नाही.