परभणी- महाराष्ट्रात पुढील सात दिवसच पावसाची हजेरी राहणार आहे. पावसाने माघारी जाण्याची तयारी केली असून २१ ऑक्टोबर पासून राज्यभरातून पाऊस परतणार असल्याचा अंदाज प्रसिद्धी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी व्यक्त केला आहे.
पंजाबराव डख यांनी एका व्हिडिओद्वारे पावसाबाबत बोलताना म्हटले आहे की, सध्या ज्वारी आणि हरभरा या पिकांची पेरणी करताना शेतकरी दिसत आहे. मात्र पुढील सात दिवसच पावसाची राज्यात हजेरी दिसणार आहे. २१ ऑक्टोबरपासून पाऊस राज्यातून परतणार आहे. त्यानंतर हळूहळू थंडी सुरू होणार आहे. ५ नोव्हेंबरला कडाक्याची थंडी असण्याची शक्यता आहे. खरेतर पावसाचा परतीचा प्रवास १८ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या तारखेपासून जळगाव आणि मराठवाडय़ातील पाऊस माघारी जाणार आहे. त्याचप्रमाणे यंदा जमिनीमध्ये ओल टिकून असल्याने हरभऱ्याचे चांगले पीक येण्याची शक्यता आहे.
१८ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच भागातून पाऊस माघारी फिरणार असा दावा पंजाबरावांनी यावेळी केला आहे.