मुंबई – दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यंदाचे रावण दहन हे अखेरचे असेल. यापुढे असे रावण जन्माला येणार नाहीत याची खबरदारी आम्ही घेऊ,असे राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या धर्तीवर आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मेळावा घेतला. बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आझाद मैदानावर मेळावा होता. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले की, सध्या दसरा मेळाव्यांची लाट आली आहे. जो उठतो तो दसरा मेळावा घेतो. लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्याबाबत काही बोलणार नाही. मात्र एवढे खरे की शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा हाच खरा , बाकी सारे नकली आहेत,असे राऊत म्हणाले.
नकली शिवसेनावाल्यांनी मोदी आणि शहांच्या मदतीने धनुष्यबाण चोरला. पण आमच्याकडे मशाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच मशालींच्या साह्याने औरंगजेबाच्या सैन्याला कात्रजचा घाट दाखवला होता. आमची मशालही गद्दारांना कात्रजचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही, असे राऊत पुढे म्हणाले.