श्रीनगर- जम्मू-काश्मीर आणि लडाख हायकोर्टात एका मुस्लिम महिला वकिलाने हिजाब घालून हजेरी लावली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी महिला वकिलाला तिचा हिजाब काढण्यास सांगितले,परंतु महिलेने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला.यानंतर आता न्यायालयाने या खटल्याची सुनावणी करण्यास नकार देत महिला वकील चेहरा झाकून सुनावणी करू शकते का, याचा रजिस्ट्रार जनरलकडून अहवाल मागवला आहे.
सय्यद अनान कादरी नावाची एक महिला वकील कौटुंबिक हिंसाचाराशी संबंधित एका प्रकरणात याचिकाकर्त्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयात आली होती.तिने न्यायालयात वकिलाचा पेहराव केला होता,पण तिचा चेहरा पूर्णपणे हिजाबने झाकलेला होता. न्यायमूर्ती राहुल भारती यांनी तिला तिचा हिजाब काढण्यास सांगितले, तेव्हा महिला वकिलाने तो आपला मूलभूत अधिकार आहे. न्यायालय तिचा चेहरा दाखविण्यास भाग पाडू शकत नसल्याचे सांगत बुरखा काढण्यास स्पष्टपणे नकार दिला.त्यानंतर न्यायमूर्ती राहुल भारती यांनी महिला वकिलाच्या या वागणुकीवर आक्षेप घेत म्हटले की, या परिस्थितीत ही महिला कोण आहे आणि तिची ओळख काय आहे हे स्पष्ट होऊ शकत नाही. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी करण्यास नकार देत प्रकरणाला स्थगिती दिली. तसेच बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या नियमांमध्ये अशी काही तरतूद आहे का,ज्याद्वारे महिला वकील बुरखा घालून न्यायालयात हजर राहू शकतात का, असा अहवाल रजिस्ट्रार जनरलकडून मागवला आहे.