मुंबई – मुंबई महानगरातील वाढलेले वायू प्रदूषण व त्यामुळे खालावलेली हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने विविध उपाययोजना राबवणार असल्याची माहिती दिली आहे. नागरिकांसाठी विविध सूचना जारी करण्यात आल्या आहेत. महापालिकेने जारी केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबई महानगर पालिकेने म्हटले आहे की, हिवाळ्यातील वाऱ्याचा वेग कमी असल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. वाहनांचे उत्सर्जन, बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ तसेच स्थानिक हवामानामुळे धुकेसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी मुंबईत एकूण ४५ वायू गुणवत्ता संनियंत्रण यंत्रे स्थापन करण्यात येणार आहेत. बांधकाम सुरु असलेली इमारत पूर्णपणे झाकून बंदिस्त करणे, बांधकाम प्रकल्पाभोवती किमान २५ फूट उंचीचे आच्छादन, सातत्याने पाणी फवारणी, मिस्टिंग संयंत्राचा वापर, राडारोड्याची शास्त्रोक्त साठवण व ने-आण, हवेच्या गुणवत्तेचे निरिक्षण करणारे संवेदक (सेन्सर) लावणे आणि वाहनांची चाके धुण्याची सुविधा वापरावी अशा सूचना दिल्या आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही देण्यात आले आहेत. वायू प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी ‘मुंबई वायू प्रदूषण शमन आराखडा’ राबवण्यात येणार आहे. त्याद्वारे मिस्टिंग संयंत्रे तसेच पाण्याचे स्प्रिंकलर वापरणार असून बेकरींवर बंदी आणून स्मशानभूमीही पीएनजी, विद्युत सारख्या इंधनावर रुपांतरीत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. बेस्ट’ उपक्रमासाठी २ हजार १०० सिंगल डेकर आणि २०० डबल डेकर इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यात येत आहेत. बांधकामाच्या राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याकामी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कोकणीपाडा – दहिसर आणि शीळ फाटा, कल्याण येथे प्रत्येकी ६०० मेट्रिक टन प्रती दिन क्षमतेचे प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले.