मुंबई- राज्य शासनाच्या धर्तीवर मुंबई पालिकेमध्ये देखील ५ मे २००८ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी, अभियंते,कर्मचारी तसेच कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी पालिकेचे तीन हजार कर्मचारी अद्याप प्रतिक्षा करत आहेत. याबाबत पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत असून याबाबत कर्मचारी कृती समिती येत्या शुक्रवार १० जानेवारी रोजी पालिका आयुक्तांची भेट घेणार आहे.
महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार १ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात / अधिसूचना निर्गमित होऊन त्याआधारे १ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र शासनाच्या धोरणाच्या धर्तीवर मुंबई महापालिकेनेदेखील अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा पालिका कर्मचाऱ्यांची आहे.मात्र शासनाने परिपत्रक प्रसारित करून एक वर्ष उलटले तरीही मुंबई पालिका प्रशासन याबाबत निर्णय घेत नसल्याने महापालिका प्रशासनाकडून याबाबत कोणताही निर्णय होत नसल्याने संबंधित अधिकारी,कर्मचारी वर्ग नाराज आहे.