छत्रपती संभाजीनगर-राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी परळीमधील आपली जमीन लुबाडली, असा आरोप सारंगी प्रवीण महाजन यांनी केला आहे. भाजपा नेत्याच्या मध्यस्थीने ही फसवणूक झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. सारंगी महाजन यांनी या प्रकरणी न्यायालयाकडे दाद मागितली आहे.
सारंगी महाजन म्हणाल्या की, पंकजा मुंडे-धनंजय मुंडे यांनी प्रवीण महाजन यांच्या नावे असलेल्या परळीतील तालुक्यामधील जिरेवाडीच्या गटनंबर २४० मधील ३६.५० आर जमिनीचा व्यवहार गोविंद बालाजी मुंडे यांच्या माध्यमातून संगनमताने गोविंद माधव मुंडे, तानाजी दशरथ चाटे व पल्लवी दिलीप गीते यांच्या नावे केली. महाजन परिवारातील कोणत्याही वारसाला या ठिकाणी येऊ न देता प्रवीण महाजन यांच्या पश्चात परस्पर व्यवहार करून बोगस नोंदणीही करवून घेतली. या व्यवहाराबद्दल कोणाला सांगितल्यास माझ्या परिवाराला संपवून टाकण्याची धमकी दिली. या जमिनीबाबत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना वेळोवेळी विचारणा केली असता त्यांनी उत्तर देण्यास सतत टाळाटाळ केली. यासंदर्भात १८ ऑक्टोबर २०२४ रोजी परळी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली. मात्र, पोलिसांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे अंबाजोगाईच्या दिवाणी न्यायालयात विशेष दावा क्रमांक ६१/२४ त्याच दिवशी दाखल केला. न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचा आदेश दिला असून, २५ नोव्हेंबर रोजी दाव्याची सुनावणी आहे.