महाराष्ट्रातील भाविकांना घेऊन जाणारी बसनेपाळमधील नदीत पडून १५ जणांचा मृत्यू

गोरखपूर – महाराष्ट्रातील ४२ भाविकांना घेऊन जाणारी बस नेपाळमधील मर्सियागंडी नदीत पडून झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला आहे. हे सगळे जळगाव जिल्ह्यातील होते. आज सकाळी ही बस नेपाळ मधील पोखरा येथून काठमांडूला निघाली होती. त्यावेळी ती नेपाळमधील तनहुन जिल्ह्यातील आइना पहाडा येथील मर्सियागंडी नदीत पडली. मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.

अपघाताची माहिती मिळताच नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण विद्यालयाच्या ४५ जणांच्या पथकाने तातडीने मदतकार्य सुरु केले. या बसमध्ये एकूण ४५ यात्रेकरु होते. या अपघातातील १५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून १७ जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. या दुर्घटनेत १० जण बेपत्ता आहेत. महाराष्ट्रातील ११० जणांच्या पर्यटकांचा एक गट ३ बसमधून २० ऑगस्ट रोजी ८ दिवसांचा परवाना घेऊन नेपाळला निघाला होता. यातील बहुसंख्य यात्रेकरु हे जळगाव जिल्ह्यातील आहेत.

या दुर्घटनेची माहिती नेपाळच्या लष्कराला व सशस्त्र दलाला देण्यात आली. त्यानंतर तातडीने नेपाळी लष्करानेही या ठिकाणी मदतकार्य केले. या अपघातात बसचा वाहक बचावला असून चालकाचा मृत्यू झाला आहे. केसरवानी ट्रॅव्हल्सची ही बस होती. नेपाळच्या या यात्रेसाठी एकूण ११० यात्रेकरू निघाले होते. जळगावचे जिल्हाधिकारी नेपाळ व उत्तर प्रदेशातील संबंधित विभागांच्या संपर्कात आहेत. या संदर्भात बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, या अपघातातील मृतदेह त्यांच्या मुळ गावी आणण्यासाठी नेपाळच्या परराष्ट्र विभागाच्या संपर्कात आहोत. हे मृतदेह जळगावात आणण्यासाठी येणारा खर्च आपण उचलणार असून नेपाळच्या विभागाने तिथे या मृतदेहांचे अंत्यसंस्कार करू नयेत, अशीही विनंती केल्याचे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटद्वारे या दुर्घटनेची माहिती दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top