नवी दिल्ली – इंडिया आघाडी ही देशातील सर्व राज्यांच्या निवडणुकांसाठी समान फॉर्म्युला पाळणार नाही. त्यानुसार हरियाणा आणि दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आप यांच्यात युती होण्यास फारसा वाव दिसत नाही,परंतु इंडिया आघाडी ही महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एकत्र निवडणुका लढवेल,असे अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केले.
जयराम रमेश म्हणाले की, ज्या राज्यांमध्ये काँग्रेस नेते आणि इतर आघाडीचे भागीदार पक्ष यांच्यात सहमती असेल तेथे इंडिया आघाडी एकत्र लढेल.झारखंड आणि महाराष्ट्रात ते शक्य होणार आहे.याठिकाणी इंडिया आघाडी एकत्रच लढणार आहे.पंजाबमध्ये इंडिया आघाडीच नाही. हरियाणामध्ये आम्ही लोकसभेसाठी ‘आप’ ला एक जागा दिली होती,पण विधानसभा निवडणुकीत मात्र इंडिया आघाडी असेल असे मला वाटत नाही.कारण
गेल्या महिन्यात आम आदमी पार्टीचे दिल्ली राज्य संयोजक गोपाल राय म्हणाले होते की,त्यांच्या पक्षाची काँग्रेससोबतची युती केवळ लोकसभा निवडणुकीसाठी होती आणि पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शहरातील सत्ताधारी पक्ष एकट्याने निवडणुकीत उतरेल.झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्रात या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत,
तर दिल्लीत पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.