नवी दिल्ली- दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपा आणि आपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच दिल्लीच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपासाठी काम करणार आहे, असे सांगितले जात आहे. त्याला पलटवार म्हणून आपचे अरविंद केजरीवाल यांनी थेट सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून बोचरे प्रश्न विचारले आहेत.
गेल्या काही वर्षांत भाजपाने जी चुकीची कृत्ये केली आहेत ती तुम्हाला मान्य आहेत का, असा थेट सवाल केजरीवाल यांनी या पत्रात विचारला आहे.
ते म्हणतात की माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की दिल्ली विधानसभा निवडणुकीत संघ भाजपासाठी मते मागणार आहे. हे खरे आहे का? अशी विचारणा करत केजरीवाल यांनी या पत्राद्वारे भागवत यांना चार प्रश्न विचारले आहेत की, गेल्या काळात भाजपाने राजकारणात जे अत्यंत चुकीचे पायंडे पाडले ते तुम्हाला मान्य आहे का? भाजपाचे लोक राजरोसपणे पैशांचे वाटप करून गरीबांची मते विकत घेत आहेत. अशाप्रकारे मते विकत घेण्याचे आपण समर्थन करता का? गरीब, दलित, पूर्वांचलमधून आलेले लोक आणि झोपडपट्ट्यांमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या लोकांची नावे मतदार यादीतून कमी केली जात आहेत. असे केल्याने देशाची लोकशाही बळकट होऊ शकेल असे तुम्हाला वाटते का? असे डावपेच खेळून भाजपा देशातील लोकशाही कमजोर करत आहे असे तुम्हाला वाटत नाही का? असे सवाल केजरीवाल यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना केले आहेत.
दरम्यान, केजरीवाल यांनी भागवत यांना लिहिलेले हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होताच भाजपाने त्यावर तत्काळ प्रतिक्रिया दिली. केजरीवाल यांनी सर्वप्रथम खोटे बोलणे बंद करावे, असा पलटवार दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी केला.
दिल्लीमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्य करून असलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिकांचा व्होट बँकसारखा वापर करण्यासाठी त्यांना वास्तव्याचे अधिकृत सरकारी पुरावे आणि पैसे पुरवित आहेत, असा आरोपही सचदेवा यांनी केला.
सचदेवा पुढे असेही म्हणाले की, आपण सारे नव्या वर्षासाठी काही ना काही चांगले करण्याचा संकल्प करतो.मीदेखील केजरीवाल यांना पत्र लिहिले आहे. त्यात मी केजरीवाल यांनी खोटे बोलणे सोडून द्यावे, भ्रष्टाचार संपवावा, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या नावाखाली खोटी आश्वासने देणे बंद करावे, दारूला प्रोत्साहन देणे बंद करावे आणि यमुना नदीच्या दयनिय अवस्थेबद्दल माफी मागण्याचा आग्रह केला आहे.