मुंबई- तुम्ही भाजपाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांचे व त्यांच्या इतिहासाचे शत्रू आहात. कोश्यारी, केसरकर, त्रिवेदी हे शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलले तेव्हा तुम्ही महाराजांची नव्हे तर त्यांची बाजू घेतली. तुम्हाला महाराजांविषयी प्रेम नाही. असा घणाघात आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते आज सकाळी पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी काल केलेल्या विधानांचा समचार घेतला. राऊत म्हणाले की, औरंगजेब फॅन क्लबचे खरे अध्यक्ष फडणवीस आहेत. त्यांनी या गोष्टी तिकडे गुजरातेत सांगाव्यात. आम्ही औरंजेबाची कबर बांधणारे लोक आहोत. ज्या बाळाजी विश्वनाथ या पेशव्याने शनिवार वाड्यावर इंग्रजांचा युनियन जॅक चढवला त्याचे वारसदार फडणवीस आहेत. त्यांनी बेळगाव कारवार विषयी आपली भूमिका स्पष्ट करावी. वेगळ्या विदर्भासाठी लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतलेल्या फडणवीस याची मनिषा महाराष्ट्र तोडण्याची आहे. फडणवीस यांचा इतिहासाचा अभ्यास कच्चा आहे. शिवाजी महाराजांनी सुरतेची एकदा नाही तर दोनदा लूट केली. कारण सुरतेतील व्यापारी इस्ट इंडिया कंपनीला संरक्षणासाठी पैसे देत होते. याच्या रागामुळे शिवाजी महाराजांनी ती दोनदा लुटली. फडणवीस यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची काळजी करावी. त्यांचे कार्यकर्ते पोलिसांच्या अंगावर थुंकतात, त्यांची कॉलर पकडतात. त्यावर त्यांनी लक्ष द्यावे. त्यांच्या कार्यकर्त्यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. कारण दंगली केल्या नाहीत तर ते निवडणुका जिंकणार नाहीत. मात्र त्यांनी काहीही केले तरी मविआच राज्यात सत्तेवर येणार आहे. फडणवीस यांनी नेहरुंविषयी धादांत खोटे विधान केले. पंडित नेहरुंनी आपल्या एका वाक्याबद्दल १९३६ सालीच इतिहासकारांची माफी मागितली होती. तसे पत्र दिले होते. मी तुरुंगात असल्यामुळे साधनसामुग्रीची कमतरता होती त्यांमुळे माझ्याकडून ही चूक झाल्याचे नेहरुंनी सांगितले होते. देवेंद्र फडणवीस हे चुकीचा इतिहास पसरवत आहेत.