पुणे- बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक अत्याचारप्रकरणी तिन्ही आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. त्यातील एका आरोपीला पुण्यातून आणि दोन जणांना नागपुरातून जेरबंद केले. घटनास्थळासह आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू होता. त्यात गुन्हे शाखेला यश आले. आरोपी हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. तिघांपैकी दोघांवर याआधी कोंढवा पोलीस ठाण्यात पॅाक्सोचा गुन्हा दाखल आहे.
गुन्हे शाखेचा तपास सुरू असताना येवले वाडी परिसरात तिघेजण दारू खरेदी करण्यासाठी आले होते. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांना एका आरोपीची माहिती मिळाली. गुन्हे शाखेने सीसीटीव्हीचे फुटेज तरुणीच्या मित्राला दाखवले, त्याने हाच आरोपी असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर गुन्हे शाखेने या आरोपीला अटक करून २ आरोपींचा शोध सुरू केला. ते नागपुरात असल्याची माहिती मिळताच गुन्हे शाखेने नागपूरमधून त्यांना ताब्यात घेतले.
बोपदेव घाट परिसरात ३ ऑगस्टला रात्री ११ वाजता तरुणी मित्रासोबत फिरण्यास गेली होती. त्यावेळी तीन आरोपींनी तरुणीसह तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत बांबुने मारहाण केली. त्यानंतर तिघांनी तरुणाला शर्ट आणि बेल्टने बांधून तरुणीवर सामूहिक अत्याचार केला.