बोट दुर्घटनेमधील दोघे अजून बेपत्ता! स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल

मुंबई- मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणाऱ्या निलकमल या प्रवासी बोटीला नौदलाच्या स्पीड बोटने धडक दिल्याच्या दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ७ पुरुष, ५ महिला आणि २ बालकांचा समावेश आहे. तर १०१ जणांना वाचविण्यात यश आले आहे. मात्र दोघेजण अद्यापही बेपत्ता आहेत. या दोघांचा शोध सुरु आहे.
या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आले . या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात नौदलाच्या स्पीड बोट चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

निधेश अहिरे (८ रा.नाशिक), राकेश अहिरे (३४ रा.नाशिक), हर्षदा अहिरे (३१ रा.नाशिक), माही पावरा (३ रा. धुळे), शफीना अशरफ पठाण (३४ रा. गोवा), प्रविण शर्मा (३४ रा. आंध्रप्रदेश), मंगेश केळशीकर (नौदल) (३३ रा. बदलापूर), मोहम्मद रेहमान कुरेशी (३५ रा.बिहार), रमा रतीदेवी गुप्ता (५० रा. नालासोपार), महेंद्रसिंह शेखावत (नौदल) (३१ रा. नेव्हीनगर नेव्हल स्टेशन करंजा), प्रज्ञा विनोद कांबळे- (३९ रा. नवी मुंबई), टी दीपक (नौदल) (४०-४५), दीपक निळकंठ वाकचौरै (५० रा. गोवंडी) ही या दुर्घटनेतील मृतांची नावे आहेत. तर हसंराज भाटी (४३), जोहान पठाण (६ ,रा.गोवा) हे दोघे अद्याप बेपत्ता आहेत.

याबाबत पोलीस उपायुक्त प्रविण मुंडे म्हणाले की, गेट वे ऑफ इंडिया जवळ समुद्रात नौदलाच्या स्पीडबोटने जोरात धडक दिली . वेगाने बोट चालवल्याप्ररकणी नेव्हीच्या चालकावर कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातातील दोनजण अद्याप बेपत्ता आहेत. मुंबई पोलीस कोस्टल पेट्रोलिंग आणि इतर यंत्रणांच्या मदतीने शोध घेत आहे. हंसराज सतराजी भाटी आणि जोहान निसार अहमद अशी बेपत्ता प्रवाशांची नावे आहेत.

गोव्याच्या मापसा येथे वास्तव्यास असलेल्या पठाण कुटुंबातील सखीना अशरफ पठाण यांचा कालच्या दुर्घटनेत मृत्यू झाला. या बोटीवर अशरफ पठाण ,सखीना पठाण ,त्यांची दोन मुले आणि मृत सखीना पठाण यांची बहीण होते. या अपघातात अशरफ पठाण त्यांचे १० महिन्याचे लहान मूल आणि मेव्हणी बचावली. तर सखीना पठाण यांचा मृत्यू झाला. त्यांचा ६ वर्षांचा मुलगा जोहान पठाण अद्याप बेपत्ता आहे. पठाण कुटुंब पासपोर्टच्या कामासाठी मुंबईमध्ये आले होते. आजारावर उपचारासाठी पिंपळगावचे राकेश नाना आहेर हे दोन दिवसापूर्वी पत्नी आणि मुलासह मुंबईला आले होते. रूग्णालयात वैद्यकीय उपचार घेऊन ते सायंकाळी गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोटीने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले. मात्र दुर्देवी अपघातात आहेर कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला.

या भीषण कुटुंबांत अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. उत्तर प्रदेशातून फिरण्यासाठी मुंबईत आलेले एक कुटुंब या अपघातातून थोडक्यात बचावले. १५ रुपयांच्या वडापावने अख्ख्या कुटुंबाला वाचवले. एलिफंटाला जाण्यासाठी गोरखपूर येथील अंजली त्रिपाठी आणि त्यांचे कुटुंब गेटवे ऑफ इंडिया येथे आले होते. त्रिपाठी यांच्या कुटुंबाने या फेरीबोटची तिकीटे काढली होती. मात्र त्रिपाठी कुटुंबिय बोटीत चढण्याआधी कुटुंबातील चिमुकल्यांनी वडापाव खाण्याचा हट्ट धरला. मुलांच्या हट्टानंतर कुटुंबियांनीही वडापाव खाण्याचे ठरवले आणि तो खरेदी करण्यासाठी गेले. त्यात त्यांची फेरीबोट सुटली आणि त्रिपाठी कुटुंबातील कोणीच या बोटवर चढू शकले नाही. मुलांनी केलेल्या वडापावच्या हट्टामुळेच आमचे संपूर्ण कुटुंब या अपघातामधून बचावले असे अंजली त्रिपाठी यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top