बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

मुंबई – अंबरनाथ बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमधून पडून ऋतुजा गणेश जंगम या तरूणीचा मृत्यू झाला . ऋतुजा जंगम कर्जतमध्ये राहणारी होती. काल रात्री ८.३० च्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे मध्य रेल्वेवरील लोकल ट्रेनच्या गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ऋतुजा ही एका खासगी ट्रॅव्हल कंपनीत कामाला होती. ती ठाण्याहून कर्जत लोकलने घरी जाणार होती . अंबरनाथ रेल्वे स्थानकात गर्दीमुळे ती लोकलमधून खाली उतरली. मात्र घरी जाण्यास उशीर होईल म्हणून ती पुन्हा त्याच लोकलमध्ये चढली. पण गर्दीमुळे तिला आतमध्ये शिरता आले नाही. ती दारातच उभी राहिली. अंबरनाथ स्थानकातून ट्रेन सुटताच अवघ्या काही अंतरावर गर्दीमुळे तिचा हात सटकला आणि ती खाली पडली. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तिला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top