३ जणांचा मृत्यू
पॅरिस
पॅरिसमध्ये काल एक खासगी विमान विजेच्या तारेवर आदळले. या दुर्घटनेत विमानातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्ग ए४ वर स्थानिक वेळेनुसार काल दुपारी ४ च्या सुमारास घडली. अपघाताच्या अर्धा तास आधीच विमानाने उड्डाण केले होते. सेसना १७२ असे विमानाच्या मॉडेलचे नाव आहे.
उच्च व्होल्टेज इलेक्ट्रिक पॉवर केबलला विमानाचा वरचा भाग आदळला. त्यानंतर विमानाला आग लागली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचावपथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद केला व बचावकार्याला सुरुवात केली. या विमानाच्या वैमानिकाला गेल्याच वर्षी विमान चालवण्याचा परवाना मिळाला होता. त्याला १०० तासांचा जेट उडवण्याचा अनुभव होता. दरम्यान, विमान वाहतूक मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. स्थानिकांनी सांगितले की, या वर्षात आतापर्यंत ए४ राष्ट्रीय महामार्गावर दोन खासगी विमानांचे अपघात झाले आहेत. याआधीही स्थानिक अधिकाऱ्यांनी येथून विमान उड्डाणाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.