पोलीस, सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण रखडले

नागपूर : राज्यात बार्टी, सारथी, महाज्योती, ‘टीआरटीआय’ या संस्थांच्या यूपीएससी, एमपीएससीसह ‘आयबीपीएस’च्या व पोलीस आणि सैन्य भरती पूर्व प्रशिक्षणासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. आता प्रशिक्षण संस्थांची निवडही करण्यात आली. मात्र, अद्यापही या संस्थांकडून कार्यादेश मिळाला नसल्याच्या संस्थांच्या तक्रारी आहेत.

बार्टी, सारथी, महाज्योती, ‘टीआरटीआय’च्या विविध प्रशिक्षणासाठी पूर्व प्रवेश परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांची निवड केली जाते. ‘टीआरटीआय’च्या नेतृत्वात सर्व संस्थांसाठी पूर्व परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आली. यासाठी जवळपास ८ कोटींचा खर्च झाल्याची माहिती आहे. मात्र, संस्थांना कार्यादेश मिळाल्याशिवाय प्रशिक्षण सुरू होत नाही. यूपीएससी, एमपीएससी आणि आयबीपीएस परीक्षांचे वेळापत्रक निश्चित असते. मे २०२५ मध्ये यूपीएससीची पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, अद्यापही प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची निवड न झाल्याने विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण रखडले आहे.

बार्टी, सारथी, महाज्योती, ‘टीआरटीआय’ या संस्थांकडून राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी राज्यभरात प्रशिक्षण संस्थांची निवड करण्यात आली. महाज्योतीने या प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने आता बार्टी आणि टीआरटीआय या दोघांनी निवड झालेल्या प्रशिक्षण संस्थांसोबत सामंजस्य करार केला. मात्र, अद्यापही त्यांना कार्यादेश दिला नाही अशी माहिती आहे. कार्यादेश मिळाला नसल्याने प्रशिक्षण कार्यक्रमांचाही खोळंबा झाला आहे. तर आचारसंहिता जाहीर झाल्याने आता कार्यादेश कसा दिला जाणार असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मात्र पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष आणि ‘टीआरटीआय’चे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी हा आरोप फेटाळला आहे. विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण देणे हा आमचा उद्देश आहे. त्यासाठी त्यांना संस्थांची निवड करण्याचा अधिकार दिला आहे. याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेशही देण्यात आले आहेत. चुकीची माहिती पसरवून भ्रम निर्माण केला जात
असून सर्व संस्थांचे कार्यादेश त्यांना आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच देण्यात आल्याचे माध्यमांशी बोलताना डॉ. भारूड यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top