पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी १०० कोटींची जमीन देण्यास मंजुरी

मुंबई – पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील निमगाव खंडोबा मंदीर देवस्थानसाठी सुमारे १०० कोटी रुपये किंमतीची २४ एकर जागा मिळणार आहे.त्यामुळे तेथील आध्यात्मिक,तीर्थक्षेत्र पर्यटनाला चालना मिळणार आहे.

राज्यातील आणि राज्याबाहेरील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या निमगाव खंडोबा देवस्थानाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.राज्याच्या महसूल व वन विभागाने काल मंगळवारी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार मौजे निमगाव येथील गट क्रमांक १३५ मधील १४ हेक्टर ४० आर.गायरान आणि शासकीय जमीन रोपवे व सार्वजनिक सुविधांच्या बांधकामासाठी जिल्हा परिषदेकडे मोफत वर्ग करण्यात आली आहे. या जमिनीचा ताबा घेतल्यानंतर तीन वर्षांच्या आत मंजूर प्रयोजनासाठी जमिनीचा वापर सुरू करणे तसेच या भागात वृक्षलागवड करणे बंधनकारक आहे. निमगाव खंडोबा देवस्थान प्राचीन, ऐतिहासिक महत्वाचे आध्यात्मिक स्थान असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह महाराष्ट्र आणि देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे.या मंदिर परिसराचा विकास व्हावा यासाठी नितीन गडकरी यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आणि प्रयत्नशील होते.त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधीत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मौजे निमगाव येथील २४ एकर शासकीय गायरान जमिन निमगाव खंडोबा मंदीर देवस्थान परिसराच्या विकासासाठी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय घेतला. त्यासंबंधीचा शासननिर्णय काल जारी करण्यात आला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top