पुणे – राज्य महामंडळाच्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांवेळी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात पाण्याची बाटली नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. परीक्षा काळात घडणारे गैरप्रकार रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना यापूर्वी परीक्षा केंद्रात पाण्याची बाटली घेऊन जाण्यास मनाई होती. मात्र, पुण्यात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस या आजाराचा झपाट्याने प्रसार होत आहे. या आजारामुळे पुण्यात ६ जणांचा मृत्यू झाला. तर रुग्णसंख्या १७३ वर पोहोचली आहे. यामुळे चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फक्त पुण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.
यावर राज्य मंडळाचे चेअरमन शरद गोसावी म्हणाले की, परीक्षा केंद्रात पाणी बाटली घेऊन जाण्यास मनाई आहे. परीक्षेदरम्यान मुलांना तहान लागल्यावर त्यांना नेमून दिलेल्या व्यक्तींमार्फत पाणी दिले जाते. पण पुण्यात वाढत्या जीबीएस रुग्णसंख्येमुळे आम्ही तसेच पालक व विद्यार्थी धोका पत्करू इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांनी घरून पाणी घेऊन यावे. हा नियम आम्ही पुण्यापुरता शिथिल केला आहे.