पुणे – पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव द्यावे अशी मागणी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने प्रस्ताव पाठवून केंद्र सरकारकडे पाठवावा असेही त्यांनी म्हटले आहे.
मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुण्याचे विमानतळ लोहगाव येथे आहे. हे संतश्रेष्ठ तुकोबाराय यांचे आजोळ होते. लोहगाव आणि तुकोबारायांचे नाते जिव्हाळ्याचे होते. लोहगावच्या गावकऱ्यांची देखील हीच इच्छा आहे. महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही तशीच मागणी आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला संत तुकोबारायांचे नाव देणे योग्य ठरेल. नामकरण करताना नावाचा प्रस्ताव राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येतो. त्यानंतर नामांतराच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होते. पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे भूमिका मांडली आहे. नामांतराबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. लवकरच प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू.