सिंधुदुर्ग- नोव्हेंबरचा पहिला आठवडा उलटला तरी हापूस कलमांना मोहर येण्याऐवजी सध्या पालवी फुटण्याची प्रकिया सुरू झाली आहे.ही पालवी पूर्ण तयार होत नाही,तोपर्यंत झाडांना मोहर येणार नाही.आता या झाडांना मोहर येण्यास डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.त्यामुळे यावर्षीच्या हापूस हंगामाला विलंब होणार आहे.
दरवर्षी ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात झाडांना पालवी येऊन नोव्हेंबरमध्ये मोहर येतो. परंतु यावर्षी एक महिना उशिराने सर्व प्रकिया सुरू आहे.त्यामुळे हापूस हंगाम एक महिना लांबणार आहे. दरवर्षी जानेवारीअखेर किवा फेब्रुवारीपासून हंगामाला प्रारंभ होऊन मार्च मध्यानंतर हंगाम एन भरात येतो.परंतु यावर्षी हंगामाचे सर्वच गणित बिघडणार आहे. देवगड, मालवण, वेंगुर्ला या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हापूस लागवड केली जाते.पाऊस लांबल्यामुळे केवळ ३० टक्के आंबा कलमांना पालवी आली आहे, तर उर्वरित ७० टक्के झाडांना पालवी आणि अजिबात मोहर दिसत नाही. पुढील काही दिवसांत थंडी पडली तरच चांगला मोहर येऊ शकेल. मात्र सद्यःस्थिती हंगामाच्या दृष्टीने चिंताजनक आहे.