मुंबई- राज्यातील गर्भवती पोलिसांना शर्ट-पॅन्टच्या गणवेशाऐवजी साडी नेसण्याची चार महिन्यांनंतर मिळणारी सवलत आता पहिल्या महिन्यापासूनच देण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे. अर्थात, त्यासाठी या महिला कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यापासून १६ आठवड्यांचा काळ महिलांसाठी महत्वाचा आणि कसोटीचा असतो. या नाजूक काळात त्यांनी पोटावर पट्टा धारण केला तर गर्भावर अनावश्यक ताण येऊन गर्भपात होण्याची शक्यता असते, असा अभिप्राय पोलीस शल्यचिकित्सक आणि पोलीस रुग्णालयांसह सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून गृहविभागाला पाठविण्यात आला होता. त्याचा विचार करून आता १६ आठवड्यानंतर दिली जाणारी साडी नेसण्याची सवलत आता पहिल्या महिन्यापासून करण्यात आली आहे.