परभणी- परभणीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्याच्या घटनेनंतर तिचे पडसाद बऱ्याच ठिकाणी पडले. परभणी तालुक्यात सेलू, गंगाखेड, पूर्णा, पालम, जिंतूर, मानवत, सोनपेठ आज बंदची हाक दिली होती. व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद ठेवली. काही तालुक्यांमध्ये आज असलेला आठवडे बाजार भरला नाही.
मराठवाड्यात आज जालन्यासह हिंगोलीमध्येही आंबेडकरवादी संघटनांकडून जिल्हा बंदची हाक दिली होती. आंबेडकरवादी संघटनांच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. तसेच हिंगोलीतून परभणीला जाणाऱ्या बस बंद ठेवल्या होत्या. तर जालन्याहून परभणीकडे जाणाऱ्या बसच्या आठ फेऱ्या रद्द केल्या होत्या. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला होता. दरम्यान, हिंगोलीत भीमसैनिकांनी आंबेडकर पुतळा परिसरात आक्रमक होत आंदोलन सुरू केले होते. मात्र हिंगोली पोलिसांनी आंदोलन सुरू होण्याआधीच अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे आंदोलक संतप्त झाले होते. आमच्या निर्दोष कार्यकर्त्यांना आधी सोडून द्या त्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेऊ असा पवित्रा घेतल्याने अखेर पोलिसांनी ५ कार्यकर्त्यांची सुटका केली.