परभणी – परभणीत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची दोन दिवसांपूर्वी विटंबना केली होती.या घटनेनंतर झालेल्या हिंसाचारात अटक केलेल्यांपैकी एका तरुणाचा आज पोलीस कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी असे मृतकाचे नाव असून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी या तरुणास मृत घोषित केले. सोमनाथ सूर्यवंशी हा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. या घटनेमुळे परभणीत आज पुन्हा वातावरण तापले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याची घटना १० डिसेंबरला घडली होती. या घटनेनंतर आंबेडकरी संघटनांनी परभणी बंद पुकारला होता. त्यात जाळपोळ व दगडफेक झाली होती.पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ८ गुन्ह्यांची नोंद करून ५० जणांना अटक केली आहे.
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक शहाजी उमाप यांनी सांगितले की, या तरुणाच्या मृतदेहाचे न्यायाधीशांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केले जाणार आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होईल. परभणी शहरात सध्या जमाबंदी आहे. मात्र, कोणतीही संचारबंदी नाही.