वॉशिंग्टन- सूर्याच्या अगदी जवळ पोहोचलेले अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे ‘पार्कर सोलर प्रोब’ हे अंतराळयान तब्बल 982 अंश सेल्सिअस तापमानातही टिकून राहिले, हे आता स्पष्ट झाले आहे. नासाने काल ही माहिती दिली. 1 जानेवारी रोजी हे यान आपली स्थिती आणि जवळून टिपलेली सूर्याची छायाचित्रे पृथ्वीवर पाठविणार आहे, असेही नासाने सांगितले.
25 डिसेंबर रोजी संध्याकाळी या यानाने सूर्याच्या आतापर्यंत कुठलेही यान पोहोचले नसेल इतक्या जवळ पोहोचले. हे यान सूर्यापासून सुमारे 61 लाख किलोमीटर अंतरावरून ताशी 6.9 लाख किलोमीटर वेगाने गेले. इतक्या जवळून जाणारे हे जगातील पहिले यान ठरले. मात्र एवढ्या प्रचंड तापमानात हे यान तग धरते किंवा नाही हे कळण्यासाठी तीन दिवस थांबावे लागेल, असे त्यावेळी नासाने सांगितले होते. नासाच्या नियोजनानुसार सर्व काही सुरळीत पार पडले आणि ठरल्याप्रमाणे काल 28 डिसेंबर रोजी यानाकडून नासाला सिग्नल मिळाला. त्यामुळे यान सुरक्षित असल्याचे नासाला समजले.
सूर्याविषयी अधिक माहिती गोळा करणे हा नासाच्या या मोहिमेचा उद्देश होता. तो बऱ्याच अंशी सफल झाला आहे. सूर्य आणि त्याचा आपल्या सौरमालेवर होणारा परिणाम समजून घेण्याच्या दिशेने मानवाने टाकलेले हे एक मोठे पाऊल मानले जाते.